यशटी
जगातलं सगळ्यात अलिशान वाहन... प्रवाश्यांच्या सेवेस (?) सदैव तत्परतेने हजर... या वाहनाने करायचा प्रवास काही मुख्य टप्प्यांतून पार पडतो. तसच एकदा प्रवासाचा निर्णय घेतल्यावर तुम्हाला अनेक कसोट्यांना सामोरे जावं लागतं आणि त्यासाठी तुम्ही स्वतःला विशेष पद्धतीने develop केलं पाहिजे.
टप्पा १ – बसची वाट पाहणे
चिपळूणला आईकडे बर्याच दिवसांत एस.टी. ने गेलो नव्हतो. यावेळी का कोणास ठाऊक पण महामंडळाकडे पुन्हा वळलो .. महामंडळाच्या लाल डब्यातून असो, किंवा निम-आराम किंवा आराम बस मधून, प्रवासाला निश्चित असं वेळापत्रक असतं त्यामुळे ताशी ४०-४५ कि.मी.पेक्षा जास्त दराने अंतर कापलं जाणार नाही याची मानसिक तयारी असतेच. ती ज्यांची नसते असे महाभाग हा संपूर्ण प्रवास चरफडत पार पाडतात .. आणि इतरजण मात्र एखाद्या माहेरवाशिणिला माहेरचं एखादं काही, सासरी वेगळं काही पटल्यानंतरही जितकं खटकेल तितक्याच शांतपणाने त्या प्रवासाशी मिळतं घेत असतात. तर काल माझा असा प्रवास अनेक वर्षांनी मी अनुभवत होतो.