भार झाला
Submitted by तुषार जोशी on 23 January, 2011 - 08:29
जन्मतांच घरच्यांचे तोंड कडू
तास तास एकटीला देती रडू
मुलगी असणे असे तिचा दोष
साहते बिचारी सगळ्यांचा द्वेष
रडताना रडण्याचा वीट आला
पापण्यांना आसवांचा भार झाला
गोड धोड पण वाटलेच नाही
म्हणती जन्माला आली कशाला ही
मुलगा असता तं हवा होता
हुंडा जमवावा लागणार आता
अवकळा आली सगळ्या घराला
पापण्यांना आसवांचा भार झाला
जन्माला आली आहे ती जगेल
हळू हळू तिला प्रश्न पडतील
माझा काय दोष सांगा ती म्हणेल
कुणापाशी नीट उत्तर नसेल
निरागस असताना कष्ट तिला
पापण्यांना आसवांचा भार झाला
गुलमोहर:
शेअर करा