खेळावर प्रेम असणार्या वाचकांसाठी (पुस्तकपरिचय : Beartown)
Submitted by ललिता-प्रीति on 3 March, 2025 - 00:33
स्वीडनच्या आर्क्टिक भागातलं एक लहानसं गाव- बेअरटाऊन. हे गाव आइस-हॉकीच्या प्रेमात बुडलेलं आहे. They talk ice-hockey, eat ice-hockey, sleep ice-hockey अशी परिस्थिती. गावात बेकारी वाढीस लागली आहे. बिनकामाची किंवा कामासाठी गाव सोडावं लागलेली माणसं वाढत चालली आहेत. अशा काळात हॉकीचाच (पुस्तकात बहुतेक ठिकाणी फक्त ‘हॉकी’ असाच उल्लेख आहे) त्यांना मोठा आधार वाटतो. १५-२० वर्षांपूर्वी बेअरटाऊनचा पुरुष संघ स्वीडनच्या राष्ट्रीय स्पर्धेच्या फायनलला गेलेला. तो या गावाच्या हॉकीच्या इतिहासातला सर्वोच्च, सोनेरी क्षण. पण त्यानंतर इथल्या हॉकीत विशेष काहीच घडलेलं नाही.