अपघातग्रस्त काही

अपघातग्रस्त काही, अन्यायग्रस्त काही

Submitted by बेफ़िकीर on 24 December, 2024 - 19:33

अपघातग्रस्त काही, अन्यायग्रस्त काही
बघतात बातम्या अन, जगतात मस्त काही

दुनियेत रोज भरतो बाजार हा मनांचा
काही महागडी तर, मिळतात स्वस्त काही

गझलेत भ्रष्ट काही ठरले स्वयंप्रकाशी
उदयासही न येता झालेत अस्त काही

निरखून पाहिले तर कळतात हे मुखवटे
वरतून त्रस्त काही, आतून त्रस्त काही

जी झोप घालवत ती, गेली कुठे कळेना
का घालतात स्वप्ने नवखीच गस्त काही

नसती मुळात वसली, तर वाचलीच असती
वसण्यामुळेच गावे झालीत ध्वस्त काही

कुठलीच गोष्ट येथे मिळणे अशक्य नाही
पण जीव गुदमरवती शहरे प्रशस्त काही

विषय: 
Subscribe to RSS - अपघातग्रस्त काही