अल्बर्टा मधील बान्फ (Banff), जास्पर, कॅनमोर सारख्या प्रसिद्ध जागा फिरून झाल्या होत्या. उन्हाळा संपला होता आणि हिवाळा सुरु होण्याआधी फॉलचे काही दिवस हाताशी शिल्लक होते. कॅल्गरी पासून जवळच कुठेतरी फिरायला जावे असा विचार डोक्यात सुरु होता तेव्हा मॅप वर एक भव्य तलाव दिसला, जो कॅनडा आणि अमेरिका अश्या दोन्ही देशात पसरलेला होता व आजूबाजूला डोंगर रांगा दिसत होत्या. तिथे कुठला ट्रेक करता येईल का अशी माहिती काढत होतो, तेव्हा हा तलाव म्हणजे वॉटरटन तलाव असून हा एक मोठा नॅशनल पार्क आहे अशी माहिती इंटरनेट वर मिळाली. या तलावासोबतच इथे बघण्यासाठी बऱ्याच जागा आहेत असेही लक्षात आले.