वॉटरटन (अ हिडन जेम इन कॅनडा) - भाग १ - कॅनडा ते अमेरिका "डंकी" प्रवास

Submitted by मध्यलोक on 21 January, 2024 - 20:21

अल्बर्टा मधील बान्फ (Banff), जास्पर, कॅनमोर सारख्या प्रसिद्ध जागा फिरून झाल्या होत्या. उन्हाळा संपला होता आणि हिवाळा सुरु होण्याआधी फॉलचे काही दिवस हाताशी शिल्लक होते. कॅल्गरी पासून जवळच कुठेतरी फिरायला जावे असा विचार डोक्यात सुरु होता तेव्हा मॅप वर एक भव्य तलाव दिसला, जो कॅनडा आणि अमेरिका अश्या दोन्ही देशात पसरलेला होता व आजूबाजूला डोंगर रांगा दिसत होत्या. तिथे कुठला ट्रेक करता येईल का अशी माहिती काढत होतो, तेव्हा हा तलाव म्हणजे वॉटरटन तलाव असून हा एक मोठा नॅशनल पार्क आहे अशी माहिती इंटरनेट वर मिळाली. या तलावासोबतच इथे बघण्यासाठी बऱ्याच जागा आहेत असेही लक्षात आले. मग काय अजून माहिती काढली आणि लक्षात आले जर पहाटे लवकर निघालो तर एका दिवसात इथे फिरून कॅल्गरी मध्ये परत येणे सहज शक्य होईल. डोक्यात हा विचार घोळत असताना असेही लक्षात आले कि ट्रेक पेक्षा हि फॅमिली ट्रिप करणे जास्त योग्य होईल, त्यामुळे माझ्या मित्राला या ट्रिप बद्दल विचारले. दोंघांच्या वेळा जुळल्या आणि प्लॅन फिक्स झाला.
Waterton-P1-01.jpgवॉटरटन लेक

वॉटरटन हे कॅल्गरी पासून साधारण 270 किलोमीटर दूर असून कॅनडा व अमेरिकेच्या बॉर्डर वर असलेले एक छोटेसे खेडे आहे.
Waterton-P1-02.jpgवाटेत दिसलेल्या विंडमिल्स

इथे अल्बर्टा मधील पठारी भूमी आणि रॉकी डोंगररांगा इथे एकत्र येतात आणि आपल्याला सृष्टीचा एक अद्भुत नजारा दिसतो. इथे जाण्याच्या रस्ता अगदी सुंदर आहे आणि वाटेत अनेक प्राणी ही दिसतात असे मी वाचून होतो. आम्हालाही त्याची प्रचिती सुरुवातीलाच आली. कॅल्गरी सोडून थोडाच वेळ झाला असेल तेव्हा वाटेत हरिणांची जोडी दिसली.
Waterton-P1-03.jpgवाटेत दिसलेली हरिणांची जोडी

जसे आम्ही वॉटरटनच्या जवळ जात होतो तसा आजूबाजूचा प्रदेश कुस बदलत होता आणि डोंगर रांगा दिसायला सुरुवात होत होती. एवढ्यातच पूर्वेला तांबडे फुटले आणि आम्ही गाडी थांबवून सूर्योदय बघितला.
Waterton-P1-04.jpgडोंगररांगा आणि पठारी प्रदेश

Waterton-P1-05.jpgसूर्योदय

थोडे पुढे आलो तर रोड साईड टर्नआऊट जागा होती जिथून डोंगररांगांचे विहंगम दृश्य दिसत . मग काय पुन्हा गाडी थांबवली आणि थोडी फोटोग्राफी केली. इथे एका बोर्डवर शब्द होते "वॉटरटन नॅशनल पार्क व्हेअर द माउंटेनस् द मीट प्रेरीज". हो आणि इथे शब्दशः असेच होते, पठार संपून समोर भलेमोठे डोंगर आपल्याला दिसत होते.
Waterton-P1-06.jpgव्हेअर द माउंटेनस् द मीट प्रेरी

Waterton-P1-07.jpgपठार आणि डोंगरांचा संगम होताना

Waterton-P1-08.jpgफिरुनी नवी जन्मेन मी

त्यामुळेच इथे असणारी जैवविविधता जपण्यासाठी हा संपूर्ण प्रदेश नॅशनल पार्क म्हणून घोषित करण्यात आला आहे. नॅशनल पार्क असल्याने इथे फिरण्यासाठी आपल्याला तिकीट काढावे लागते आणि आत प्रवेश करता येतो. तिकीट काढले आणि आम्ही पार्क मध्ये प्रवेश केला.
Waterton-P1-09.jpgनॅशनल पार्कचा बोर्ड

Waterton-P1-10.jpgएन्ट्री बूथ

आम्ही वॉटरटन गावात सकाळीच पोहोचलो असल्याने गावात अजूनही शांतता होती व कसलीच वर्दळ नव्हती. त्यामुळे आम्ही थेट इन्फो सेंटर कडे जाण्याचे ठरवले. गाडी पार्किंगला लावली. आत गेलो तेव्हा इन्फो सेंटर बंद दिसले म्हणून आम्ही तलावाकडे आणि तिथे असणाऱ्या इंटरनॅशनल पिअरकडे वळलो.
Waterton-P1-11.jpgशांत आणि निवांत वॉटरटन

इथे आपल्याला कॅनडा आणि अमेरिकेच्या बॉर्डर पिलर बघता येतो. याच्या शेजारी काही बोर्ड आहेत आणि त्यावर पार्क बद्दल माहितीही वाचायला मिळते.ह्याच पार्कला अमेरिकेत ग्लेशियर नॅशनल पार्क म्हणून ओळखले जाते हे कळते.
Waterton-P1-12.jpgइंटरनॅशनल बॉर्डर पिलर

Waterton-P1-13.jpgमाउंटन कपल

ह्या पिलर नंतर आम्ही वळलो ते तलावात क्रुझ करण्यासाठी. क्रूझची तिकिटे काढली आणि बोट मध्ये प्रवेश केला. सकाळची वेळ असल्याने गर्दी नव्हती आणि क्रुझवर आम्ही फक्त काही मोजकेच लोक होतो. त्यामुळे ही आमची प्रायव्हेट क्रुझ ठरणार होती.
Waterton-P1-14.jpgक्रूझ बोट

Waterton-P1-15.jpgबोटीत शिरतांना

बोटीवर शिरताच कॅप्टनने क्रूझ बद्दल थोडी माहिती दिली. तोवर बोट वेळात खोल पाण्यात शिरली. दोन्ही बाजूला डोंगर व मध्ये पाणी असे दृश्य दिसू लागले.
Waterton-P1-16.jpgखोल पाणी आणि चहू बाजूने डोंगररांगा

कॅप्टनने सांगितल्या प्रमाणे आम्ही कॅनडा बॉर्डर क्रॉस करून क्षणभरासाठी अमेरिकेतील मोन्टाना राज्यातील ग्लेशियर नॅशनल पार्क मध्ये जाणार होतो. आमच्यासाठी हा एक वेगळा अनुभव होता. अमेरिकेचा व्हिसा नसताना सुद्धा आम्ही अमेरिकेत प्रवेश करणार होतो.

साधारण २५ मिनिटांच्या प्रवासानंतर आम्ही आता काही क्षणांत अमेरिकेत प्रवेश करणार होतो. 49 डिग्री latitude किंवा 49th parallel, नॉर्थ अमेरिका खंडात असणारी कॅनडा व अमेरिकेची बॉर्डर. मानवरहित, कुंपण नसलेली अशी हि बॉर्डर. कॅप्टनने दिलेल्या माहितीनुसार जगातील सगळ्यात मोठी अन-डिफेंडेड बॉर्डर, जिथे प्राणी पक्षी मुक्त संचार करतात. कॅप्टनच्या शब्दात, "Border divides but still one eco system, bear doesn't stop due to border, nature sees no boundaries". कदाचित त्याने सुद्धा "पंछी नादिया पवन के झोंके,कोई सरहद ना इंहे रोके" ऐकले असावे. या अद्वितीय वैशिष्ट्यामुळे या पार्क ला इंटरनॅशनल पिस पार्क असेही नाव देण्यात आले आहे.

Waterton-P1-17.jpgइंटरनॅशनल बॉर्डर (झाडांची गॅप) – एका बाजूला कॅनडा तर दुसरीकडे अमेरिका

हि माहिती ऐकत असताना आणि बॉर्डर बघत असताना आमच्या बोटीने व आम्ही आता अमेरिकेतील मोन्टाना राज्यात प्रवेश केला आणि समोर होती अमेरिकेची जमीन. तेव्ह्ढ्यातच कॅप्टनने विचारले, होडीचे इंजिन बंद करून आपण परिसराचा अनुभव घ्यायचा का? आम्ही सगळ्यांनी होकार दर्शवला. मग होडीचे इंजिन बंद करण्यात आले. समोरून वाहणाऱ्या झऱ्याचे पाणी आणि होडीच्या तरांगण्याचा आवाज एवढाच काय तो आवाज आम्ही आता ऐकत होतो.
Waterton-P1-18.jpgमोन्टाना, अमेरिकेन राज्याची जमीन

या काही क्षणात आम्हा सगळ्यांना अलोकिक असा अनुभव मिळाला आणि त्या नंतर आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. साधारण 30 मिनिटात आम्ही पुन्हा वॉटरटनला पोहोचलो.
Waterton-P1-19.jpgपरतीचा प्रवास

खाली उतरलो आणि आठवण म्हणून कॅप्टन व सैलर सोबत एक सेल्फी घेतला.
Waterton-P1-20.jpgकॅप्टन व सैलर सोबत सेल्फी

आता वेळ होती वॉटरटन एक्स्प्लोर करण्याची.
Waterton-P1-21.jpgवॉटरटन गावातील एक रम्य घर

वॉटरटन मध्ये काय बघितले याची माहिती आणि बेयरने आम्हाला दिलेल्या दर्शनाचा प्रसंगाची जोड पुढील भागात देईनच.
~ मध्यलोक

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त! कसला निसर्गरम्य प्रदेश आहे ! सगळेच फोटो सुंदर!

जगातील सगळ्यात मोठी अन-डिफेंडेड बॉर्डर, जिथे प्राणी पक्षी मुक्त संचार करतात. >>> छान Happy

पुढील भागाच्या प्रतीक्षेत...

हा डंकी प्रवास नाही ना. ते अलबर्टा मधुन गेल्या विंटर मध्ये गुज्जू कुटुंब मॉटाना मध्ये जाताना गेले ते डंकी.
अर्थात तुम्ही ४९थ पॅरलल स्टँपिंग शिवाय ओलांडलीत म्हणून म्हणत असणार.

फार भारी
मस्त जागा आणि वर्णन पण अगदी छान, अगदी ओघवते

रेफ्युजी मधलं गाणं तर अगदीच

मला हेडिंग वाचून वाटलं, गुपचूप जाऊन आलाय
पण हे तर राजरोस झालं Happy

पुढील भागाच्या प्रतीक्षेत... >> भाग २ पोस्ट केलाय, त्यावर तुमचा प्रतिसाद हि आवडला Happy

हा डंकी प्रवास नाही ना. >>> नाही, तसा टेकनिकली नाही, फक्त ४९th पॅरलल स्टँपिंग शिवाय ओलांडली म्हणून तसे लिहिले. आमच्या होडीला तिथवर नेले होते, सगळ्याच होड्यांना तिथवर नेत नाहीत बहुदा, आम्ही मोजके लोक होतो, सकाळची वेळ होती आणि गर्दी नव्हती म्हणून आम्हाला लाभ मिळाला असे आता कळले Happy

मस्त लेख, पुढील भागाच्या प्रतिक्षेत >>> भाग २ पोस्ट केलाय

रेफ्युजी मधलं गाणं तर अगदीच >> YouTube चॅनेल वर कॅप्टन च्या आवाजातील विडिओ आहे, त्याने हे वाक्य म्हटले कि मला रेफ्युजीच आठवला

पण हे तर राजरोस झालं >> वर लिहिल तस एवढं हि राजरोस नाही, आम्ही लकी होतो त्या दिवशी