पिकपंढरी
Submitted by सो भि या on 14 October, 2023 - 04:38
भातरोपांची हिरवळ, मुग्ध हवेत गारवा
काळ्या आईन नेसला, शालु भरजरी हिरवा
रोप एकामागे एक, उभी देखनी सुरेख
जशी रांगेत वारीच्या, वारकरी एक एक
बहरती परजागी, रोप भाताची निराळी
लेक लाडकी जशी, पर-प्रपंच सांभाळी
रानावनात अवध्या, सांडी सुर्याचे किरण
काळ्याआईच्या तान्ह्याला, करी तेजाचे कोंदण
आषाढ सरला, लागे श्रावणी हुरहूर
निळे मनाचे पाखरू, रानोमाळ भिरभिर
सर सर पावसाची, भेटे उन्हा उराउरी
उनपावसाचा खेळ, मनोहर खरोखरी
फेर धरूनी घुमतो, वारा वाजवी बासरी
दंग होवुनी नाचती, रोपे धान्याची शिवारी
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा: