चांदण्याचा

आभास चांदण्याचा

Submitted by क्षितिज रंगी on 8 June, 2022 - 06:29

'माये'त माखलेला, आभास चांदण्याचा
पदरास माऊलीच्या, का वास चांदण्याचा?

आभाळ रोज घेते, काळ्या घना कवेत
डोळ्यात मात्र माझ्या, विश्वास चांदण्याचा!

वाटेत सांडलेल्या, काट्यात चालतांना
शेल्यात बांधलेला, सहवास चांदण्याचा

बेचैन जीव होता, गातो सुरेल गाणे
छेडीत सुर जातो, हृदयास चांदण्याचा

तेवून दीप सांगे, काळोख दूर सारा
आधार वाटतो या, देवास चांदण्याचा

सोडून जात असलो, देहास आज माझ्या
देईन एक तारा, व्योमास चांदण्याचा

काळोख फार झाला, डोहात काळजाच्या
उजळून कोष द्यावा, जीवास चांदण्याचा

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - चांदण्याचा