निर्माल्याचा जुना जुना मकरंद केवढा सुंदर
Submitted by बेफ़िकीर on 14 February, 2022 - 03:18
नवी गझल - १४.०२.२०२२
=====
निर्माल्याचा जुना जुना मकरंद केवढा सुंदर
नवे न काही सुचणे हा आनंद केवढा सुंदर
त्यांच्या पूर्तीसाठी आता झुंजत नाही, बघता
हा इच्छांनी पुकारलेला बंद केवढा सुंदर
आतमधे येऊन निराशा पदरी पडण्यापेक्षा
तुमच्या हृदयाचा दरवाजा बंद केवढा सुंदर
तुला कळावे म्हणून मी आजन्म कशाला लढलो
तुला न ऐकू येणारा आक्रंद केवढा सुंदर
किती बिचारा थकला होता मला टिकवण्यासाठी
श्वास जरा झाला आताशा मंद...केवढा सुंदर
कुणीच नसते साथ द्यायला तेव्हा कोठे कळते
स्वतःत रमण्यामधील परमानंद केवढा सुंदर
विषय:
शब्दखुणा: