उशिरा सांगितलेस नशीबा

उशिरा सांगितलेस नशीबा...

Submitted by बेफ़िकीर on 5 January, 2021 - 11:53

उशिरा सांगितलेस नशीबा...
=====

उशिरा सांगितलेस नशीबा, पण आभारी आहे
मीच मनोव्यापारी केवळ... जग व्यवहारी आहे

नकोस येऊ सध्या येथे, अडकशील नाहक तू
मनात दुखऱ्या हृदयांची त्रासिक रहदारी आहे

तसे म्हणायाचे तर कोणी इथे आपले नाही
तसे म्हणायाचे तर अपुली दुनिया सारी आहे

तू असतानाच्या जगण्याचा स्वाद निराळा होता
तू नसताना जगण्याचीही लज्जत न्यारी आहे

कुणी जरासा बरा वागला तरी वाटते हल्ली
किती फसवतो आहे साला, काय हुशारी आहे

कोण भेटते आजकाल हे समजत नाही काही
स्वार्थी सरडा आहे की तो साप विषारी आहे

Subscribe to RSS - उशिरा सांगितलेस नशीबा