एकेकाळी शेतकऱ्याच्या गरजा त्याच्या परिसरातच भागायच्या. बियाणं , अवजारं , खत आणि बाजारपेठही. आलेल्या पिकातील सर्वोत्तम भाग पुढच्या मोसमाच्या बियाण्यासाठी राखून ठेवला जायचा. शेताच्या पाणीपुरवठ्याची व्यवस्था मोट, बैल ह्यांच्या साहाय्याने होत असे. बैलाचं खाणं म्हणजे इंधन शेतावर तयार होत असे आणि बैलांचं शेण खत म्हणून वापरलं जायचं. मोटेची दुरुस्ती गावातला कारागीर करू शकत होता. एकूण काय की पंचक्रोशीच्या बाहेर जावं लागेल, असं काही नसायचं. पर्यावरणपूरक म्हणता येईल अशी व्यवस्था होती.
प्राथमिक शाळेतल्या बालभारती मराठीच्या पुस्तकात एक भैरूचा धडा होता. ‘पहाट झाली, भैरू उठला. बैल सोडले. औत घेतले. शेतात जाऊन औत धरले’ असं काही शेताचं आणि शेतीतल्या कामांचं वर्णन त्यात होतं. आमच्यासारख्या शहरात राहणाऱ्या आणि मर्ढेकरांच्या कवितेतल्या ‘ सकाळी उठोनि चहाकॉफी घ्यावी, तशीच गाठावी वीज-गाडी’ ह्या वातावरणात वाढलेल्या मुलांना शेतीकामाची इतकीच तोंडओळख असे.
जीवनज्योती कृषी उद्योग
![IMG_20200622_103856936[1].jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u31347/IMG_20200622_103856936%5B1%5D.jpg)
पुण्यापेक्षा मावळ भागात पाऊस जास्तच पडतो. सध्या तर पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे शेताच्या आसपास सगळीकडे गच्च हिरवं वातावरण आहे. जवळच्या डोंगरांवरून धबधबे वाहताना दिसतात. तो भाग इंद्रायणी तांदुळाचा. भाताच्या शेतात पाणी भरलं आहे. भाताच्या पिकाचा सुगंधही जाणवतो.