या मनास एकटे करून चालला
Submitted by बेफ़िकीर on 19 July, 2020 - 12:02
या मनास एकटे करून चालला
=====
या मनास एकटे करून चालला
एक एक सोबती निघून चालला
काळ तर सदाच राहिला पुढे पुढे
एक एक हातही सुटून चालला
का प्रवेशला मुळात, काय माहिती
मैफिलीमधून जो उठून चालला
रुग्ण राहिला बघत सवंगड्यास .. जो
"थांबतोय की" असे म्हणून चालला
भग्न मन किती तपासले, कळे न पण
तीर नेमका इथे कुठून चालला
पोचला कुठे बघा, उगाच पाहता
चालला इथून की तिथून चालला
मोह, तत्व, दोन रूळ जीवना तुझे
'बेफिकीर' आपला मधून चालला
=====
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा: