मैफिल
अशा चांद राती , तुझा हात हाती
तु जवळी राहा ऋतू खमाज गाती
नको ते किनारे फुलांचे पसारे
आतुर दोघे तरी दुरावा कसा रे
मी दीप गाते उजळत फुलवाती
तु मल्हार गाता मेघ बरसुन जाती
मी तल्लीन व्हावे तुझ्या सप्तकांनी
मग बागेश्री गावी या तारकांनी
श्वासानी फुलावे स्वरातून आता
जहर हे भिनावे तु आलाप घेता
मग स्वाधीन व्हावे मी सुरुती गावी
तू केदार गाता रात उलटत जावी
सुखांच्या सरींनी पहाट भिजूनीच यावी
ओल्या क्षणांची एक सरगम व्हावी
सुमधुर शेवटाची तू भैरवी ती घ्यावी
अशा चांद राती रोज मैफिल व्हावी