तापोळा
फुटलेल्या अंगठ्यावर तिनं चिरगुट बांधल.
"ठणका मारतुय का?"
"लय दुखतय"
"आसूदी आता, घरी गेल्यावर हाळद लावू"
"हू.."
डबडबलेल्या डोळ्यांनी तो मागोमाग चालत राहिला.
"आयं, सरकार लय मोटं आसतं का ग?"
"हू.. लय मोटं आसतं"
"मजी लायटीच्या डांबापेक्शाबी उच्ची?"
"हू.. लय उच्ची आसतं, आता गप चाल"
तांबूरस्त्यानं चालत गेल्यावर रुकड्यायचं बारकं देवाळ लागलं. त्याच्या जरासं म्होरं कटावर वाट बघत बसलेल्या बाया दिसल्या. पाठीमागे हिरव्यागार गवतात खळाळून चारी वाहत होती
"आयुव, आज सोन्याबी आलाय का?, कशाला आणलवं यवढ्या उनातानात"
"आलाय म्हागं लागून, चला, उटा आता"