मला लाभलेल्या सोयींनो माफ करा

मला लाभलेल्या सोयींनो माफ करा

Submitted by बेफ़िकीर on 9 January, 2020 - 05:00

*मला लाभलेल्या सोयींनो माफ करा*
=====

माझ्या तिरडीच्या भोईंनो माफ करा
मला लाभलेल्या सोयींनो माफ करा

जगत राहिलो, तुमच्या स्वीकारून चुका
बस निर्दोष ठरत दोषींनो माफ करा

न्याय तुम्हाला देऊ शकलो नाही मी
नशेत सुचलेल्या ओळींनो माफ करा

चुकून आधी जन्माला आलो आम्ही
नव्या जमान्याच्या पोरींनो, माफ करा

फार लावली सवय तुम्हाला मी माझी
मला लागलेल्या सवयींनो माफ करा

हेतुपुरस्सर झाल्या त्यांनी मुजरा घ्या
उगाच झालेल्या भेटींनो माफ करा

राजा ठरलो असतो या लाचारांचा
मी न चाललेल्या चालींनो, माफ करा

Subscribe to RSS - मला लाभलेल्या सोयींनो माफ करा