आजोळचे घर - मोसम
गड्याच्या खांद्यावर बसलेली, टुकूटुकू नजरेने आसमंत न्याहाळणारी लहानगी. खळाळणारी नदी, नदीपलिकडे रांगोळीच्या ठिपक्यासारखी दिसणारी घरं आणि मागे - पुढे आपल्याच नादात असलेली भावंडं, मोठी माणसं. त्यांच्या बोलण्याचे आवाज. पाहता- पाहता गड्याच्या चालीने ते आवाज हवेत विरायला व्हायला लागतात, मागे पडतात. आता फक्त साथीला आसमंत आणि गड्याचं झपाझप चालणं. बघता बघता त्या चिमुकलीला गड्याच्या खांद्यावर बसायचा कंटाळा येतो. ती खांद्यावरून उतरते. कपड्यांवर उडालेली माती झटकत पुन्हापुन्हा पायाने माती उडवत राहते. मातीतलाच हाताला लागलेला दगड उचलून नदीच्या दिशेने भिरकावते.