नको वाटते हल्ली
Submitted by बेफ़िकीर on 1 March, 2019 - 07:28
गझल - नको वाटते हल्ली
=====
झोपेमध्ये स्वप्न पाहणे नको वाटते हल्ली
स्वप्नामध्ये झोप लागणे नको वाटते हल्ली
माझा मेंदू बिनभाड्याचे घर झालेला आहे
मनामनाला जपत राहणे नको वाटते हल्ली
ताडफाड बोलत मिळवावी प्रतिमा धुळीस अपुली
प्रत्येकाशी बरे वागणे नको वाटते हल्ली
स्मरणांचा कोलाहल करतो इतके त्रस्त मनाला
कसलाही आवाज ऐकणे नको वाटते हल्ली
एखादा पर्याय निराळा का या जगात नसतो
आपण असणे, आपण नसणे नको वाटते हल्ली
विरुद्ध बाजूने जाण्याची जरुरी कधीच नव्हती
मात्र प्रवाहासवे वाहणे नको वाटते हल्ली
विषय:
शब्दखुणा: