गझल - रस्त्यांनो
Submitted by बेफ़िकीर on 27 December, 2018 - 02:35
गझल - रस्त्यांनो
=====
जरी नावाजला जाईल तुमचा थाट रस्त्यांनो
दिशा देईल चुकलेल्यास भुरटी वाट रस्त्यांनो
निधर्मी प्रेमवर्णी गाव एखादे तरी शोधा
जिथे कुठल्याच रक्ताचा न वाहो पाट रस्त्यांनो
उताराचे वळण केव्हातरी येतेच सामोरे
शिखर गाठायला नसतात केवळ घाट रस्त्यांनो
विरळ होते जिथे वस्ती तिथे वस्तीस असते मन
तिथे कृपया कधी पोचू नका घनदाट रस्त्यांनो
निरर्थक प्रेमगाथा थांबती शोधात अर्थाच्या
कधी टाका स्वतच्याहीकडेला खाट रस्त्यांनो
तसा सन्मार्गही उपलब्ध आहे चालण्यासाठी
तुम्ही आहात केवळ आजची पळवाट रस्त्यांनो
विषय:
शब्दखुणा: