खिजवत आहे शेतकऱ्याला
Submitted by बेफ़िकीर on 3 November, 2018 - 10:20
गझल - खिजवत आहे शेतकऱ्याला
==========
खरीप गेले, रब्बी गेले, फक्त ढेकळे उरलेली
खिजवत आहे शेतकऱ्याला एक बिसलरी भरलेली
गुंठे मोजत असताना मी, एक अडाणी पुटपुटला
जनावरे तर विकली गेली ह्या माळावर चरलेली
म्हातारी हासून बोलली मुलगा परदेशात तिचा
वृद्धाश्रम बस पुसत राहिला इतर लोचने झरलेली
एक दिशा देणारा होता तोच उतरला त्राग्याने
ती गाडी मग घेत राहिली तिची स्थानके ठरलेली
पुतळ्यांची पूजा झाल्यावर नेत्यांची वा वा होते
शेतमजूरी टाळायाला शाळा असते भरलेली
विषय:
शब्दखुणा: