जग तसे फार मोसमी आहे
Submitted by बेफ़िकीर on 13 October, 2018 - 12:23
गझल - जग तसे फार मोसमी आहे
==========
जग तसे फार मोसमी आहे
तू जिथे काल, आज मी आहे
होय देहच तुझा असो शत्रू
वृक्ष देहच तुझा शमी आहे
घागरी फुंकतात या श्रद्धा
याइथे रोज अष्टमी आहे
बाग होती तशीच आहे ही
एक फुलपाखरू कमी आहे
मी कशाला तुझे बघू पत्ते
मान्य आहे, तुझी रमी आहे
आज काहीतरी बरे झाले
काय ब्रेकिंग बातमी आहे
मी स्वतःचा नसेनही उरलो
मी तुझा मात्र नेहमी आहे
काय होणार हे कळत नाही
छान, इतकीतरी हमी आहे
फार कोणी बनू न शकल्याने
मी तसा फार संयमी आहे
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा: