फालतू मी
Submitted by बेफ़िकीर on 1 October, 2018 - 11:40
गझल - फालतू मी
==========
फालतू आरंभ माझा, फालतू हा अंत आहे
फालतू मी हे न कळणे हीच माझी खंत आहे
तू कुठे आहेस ह्याचा शोध घेणे शक्य नाही
पोचलो आता कसासा मी स्वतःपर्यंत आहे
गाळले उल्लेख जे, मी त्यावरी गुजराण करतो
जे तुला सांगीतले ते मान तू, साद्यंत आहे
येथले नाही असे काही मिळाले का कुणाला
एकही माणूस नाही जो खरा श्रीमंत आहे
त्रासला आहे तरीही त्रास ना देतो जगाला
येथला प्रत्येकजण हा ह्या युगाचा संत आहे
मुख्य व्यक्ती सोडुनी प्रत्येक व्यक्तीला म्हणालो
मी तुझा नुसताच नाही, मी तुझा अत्यंत आहे
विषय:
शब्दखुणा: