मी त्या जातीचा आहे....
Submitted by बेफ़िकीर on 26 January, 2018 - 09:07
गझल - मी त्या जातीचा आहे....
विजयोत्सव ठेवत नाही, बसगाड्या जाळत नाही
मी त्या जातीचा आहे, जी मीही पाळत नाही
मी वर्तमान अभ्यासत वागावे कसे ठरवतो
इतिहासामध्ये त्याचे उत्तर धुंडाळत नाही
कोणाचा ना कोणाचा त्याला पाठिंबा मिळतो
तो त्याच्या अनुयायांना आता कुरवाळत नाही
नावाने हाका मारे, तो आडनाव वापरतो
मैत्री शरमेने मरते, पण तो ओशाळत नाही
सत्तर वर्षांचा माझा हा देश रखेली आहे
हाही सांभाळत नाही, तोही सांभाळत नाही
-'बेफिकीर'!
(२६.०१.२०१८)
विषय:
शब्दखुणा: