कसे मी उजळवू आता तुझे अंधारलेले जग
Submitted by बेफ़िकीर on 15 April, 2017 - 03:54
हवे होते तुला माझ्याविना शाकारलेले जग
कसे मी उजळवू आता तुझे अंधारलेले जग
कसे लाभेल आम्हाला अशी झालीस मोठी तर
सुरील्या किलबिलाटाने तुझ्या झंकारलेले जग
हजारो जन्मही परिघास उल्लंघू न शकलेले
पछाडे न्यूनगंडाने मला विस्तारलेले जग
नको आमंत्रणे धाडूस केसांच्या सुगंधाने
जिव्हारी लागले आहे तुझे शृंगारलेले जग
मनाच्या आत माझ्या, यायची आलीच संधी तर
बघा यारो, जगावाचून मी साकारलेले जग
फरक दोन्हीतला समजेल तेव्हा हो बरे माझी?
तुला स्वीकारणारे जग नि तू स्वीकारलेले जग
विषय:
शब्दखुणा: