तुला वैषम्य ह्याचे की किती स्वच्छंद आहे मी
Submitted by बेफ़िकीर on 27 March, 2017 - 00:30
तुला वैषम्य ह्याचे की किती स्वच्छंद आहे मी
मला आनंद ह्याचा की तुझा आनंद आहे मी
पुढे विस्तारण्यासाठी कुणाची साथ मागावी
नभाच्या पिंजऱ्यामध्ये कधीचा बंद आहे मी
नको भाळूस माझ्यावर, मला आहेत व्यवधाने
पुन्हा प्रेमाबिमामध्ये तसाही मंद आहे मी
तुला माझ्या लिखाणाने मिळावा न्याय ही इच्छा
भयाने मूक झालेल्या, तुझा आक्रंद आहे मी
कसासा दरवळत आहे तुझ्या पश्चात मी दोस्ता
तुझ्या माझ्या स्मृतींचा खिन्नसा मकरंद आहे मी
-'बेफिकीर'!
विषय: