दाखवते की 'तितके नसते अधीर'' काहीवेळा
Submitted by बेफ़िकीर on 18 November, 2016 - 08:06
दाखवते की 'तितके नसते अधीर'' काहीवेळा
लाज राखते आत्म्याची हे शरीर काहीवेळा
दृष्ट लागते त्याच्या स्वातंत्र्याला.... राजाचीही
मात जागच्याजागी खातो वजीर काहीवेळा
आता तर ती येतच नाही, बरीच वर्षे झाली
तिला व्हायचा पूर्वी केवळ उशीर काहीवेळा
शुष्क मनाने जुन्या वह्या चाळून काढतो हल्ली
शोधत बसतो मी अश्रूंची विहीर काहीवेळा
हलके फुलके विधान करतो मनोरंजनासाठी
तरी पत्थरावरी उमटते लकीर काहीवेळा
मोहाच्या पायावरती कोणीही लोळण घेतो
कबीरसुद्धा मुळीच नसतो कबीर काहीवेळा
बाकीवेळा प्रेम तुझ्यावर करतो हे जाऊदे
प्रेम तुझे मागत असतो 'बेफिकीर' काहीवेळा
विषय:
शब्दखुणा: