मला भेटली नेहमी अशी माणसे घरा-घरामधे

मला भेटली नेहमी अशी माणसे घरा-घरामधे

Submitted by बेफ़िकीर on 8 October, 2016 - 15:02

मला भेटली नेहमी अशी माणसे घरा-घरामधे
भिन्न चेहरा जगात ज्यांचा, भिन्न चेहरा घरामधे

सुगंध शोधत होतो तेव्हा समजत नव्हते मला कधी
चाफ्याच्या वरताण घमघमे एक मोगरा घरामधे

चालवला तर खूप चालतो, नाहीतर नुसता बसतो
बापाच्या स्वरुपात वावरे खिन्न मोहरा घरामधे

संन्याश्यांची विचारशैली अंगी बाणा जमली तर
प्रवाह आहे विरक्तीमधे आणि भोवरा घरामधे

जेथे कोणी थोपटायला येऊ नाही शकत कधी
असा आपल्यासाठी ठेवा एक कोपरा घरामधे

फक्त मिसळणे निर्हेतुक ही एकच अट असते तेथे
रंग असो कुठलाही, राहो रंग पांढरा घरामधे

इतर कुठे नसताच कधीही, असे वावरा जगामधे
जणू घरी नसताच कधीही, असे वावरा घरामधे

Subscribe to RSS - मला भेटली नेहमी अशी माणसे घरा-घरामधे