तरही - नुकतीच पावसाला सुरुवात होत आहे
Submitted by बेफ़िकीर on 6 August, 2016 - 03:45
इतक्यात हे हृदय का वाह्यात होत आहे
नुकतीच पावसाला सुरुवात होत आहे
मुरतो जसा जसा मी शृंगारण्यात गझला
गंधाळण्यात तीही निष्णात होत आहे
नजरानजर, उसासे, ताटातुटी, दिलासे
जे काय होत आहे, प्रेमात होत आहे
कणभर स्वतः बदललो, पाहून थक्क झालो
हा केवढा बदल ह्या विश्वात होत आहे
अपुली लहान झोळी, नुसते बघत बसावे
चोहीकडे सुखांची खैरात होत आहे
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा: