हे म्हणताना माझे अश्रू कोणीही पाहत नाही
Submitted by बेफ़िकीर on 25 May, 2015 - 00:14
हे म्हणताना माझे अश्रू कोणीही पाहत नाही
"बरीच वर्षे झाली, मी त्या गावाला राहत नाही"
हळवे हळवे वाटत असले तर थोडे हासून पहा
दुखावले जाण्याची भीती नावाला राहत नाही
मतभेदांच्या आचेवरती प्रेमाला उकळ्या फुटणे
आताच्या दांपत्त्यांमध्ये ही वेडी चाहत नाही
कोणी वेडा उन्हात रस्त्यावर छिन्नी मारत होता
मला म्हणाला उताराकडे मृगजळ का वाहत नाही
तिचे केस पुसणे बघणारा रसिक तिथे नसणार कुणी
'बेफिकीर' झाली आहे ती, रोज रोज नाहत नाही
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा: