'यज्ञ आहे हा जिवाला जाळण्याचा...'
Submitted by dr.sunil_ahirrao on 11 January, 2015 - 23:30
यज्ञ आहे हा जिवाला जाळण्याचा
प्रेम नाही छंद नुसता भाळण्याचा
छान हा दु:खासही आला फुलोरा
ये, वसा घे वेदनेला माळण्याचा
आणशी हे रोज तू कोठुन बहाणे
केवढा हा सोस तुजला टाळण्याचा
मी करू चिंता कशाला काजळाची
सोडला संकल्प मी डागाळण्याचा
श्वास घे माझे तुझ्या श्वासात भरुनी
ये, ऋतू आला फुले गंधाळण्याचा
डॉ.सुनील अहिरराव
विषय:
शब्दखुणा: