पहाट्

क्षितिजावरचा संन्यासी

Submitted by संतोष वाटपाडे on 8 December, 2014 - 06:51

रानफ़ुलांचा तवंग आला भल्या पहाटे पाण्यावरती
धुंद गोठल्या पाचोळ्याची सळसळ झाली काठावरती
आणि अचानक पाण्यामधुनी एक बुडबुडा उंच उडाला
शांत तळ्यातिल गारठलेल्या थंड जलाच्या वाफ़ेवरती...

धुके पांढरे सरपटणारे अडखळले घनझाडांवरती
परतून आले तसेच मागे अरुंद पाऊलवाटांवरती
लक्ष चुंबने देत फ़ुलांना सरकत गेले पुढे पुढे अन
खुणा उमटल्या दाट धुक्याच्या हिरव्या हिरव्या पानांवरती....

तलम कोंदणे जागोजागी थरथरणारी चमचमणारी
फुsलपाखरे रंगीत त्यावर मुग्ध होऊनी भिरभिरणारी
तळ्यास खेटून उभ्या तरुंवर कैक पाखरे पटपट जमली
सुर्य उगवता निळ्या नभाशी घेण्यासाठी उंच भरारी...

Subscribe to RSS - पहाट्