बाप दिवंगत आहे

आई मेंढ्या हाकत आहे, बाप दिवंगत आहे

Submitted by बेफ़िकीर on 11 June, 2014 - 07:59

आई मेंढ्या हाकत आहे, बाप दिवंगत आहे
लुगड्याच्या झोपाळ्यावरती बाळ तरंगत आहे

पायामध्ये चाळ बांधुनी बैठकीस आल्यावर
मूल रडत नाही ना बघणे फार विसंगत आहे

स्थलांतराच्या सातत्याची चिंता नाही त्यांना
स्वार्थासाठी त्यावरती लिहिणारा खंगत आहे

तुम्ही फक्त माझे काका ना, म्हणत बिलगली पोरे
हीच एक त्या अनाथ जगण्यामधली रंगत आहे

ढकलाढकली करत मिळवती जागा जेवायाला
उद्या कदाचित नसणार्‍यांची अंतिम पंगत आहे

मीच एकटेपणा स्वतःचा इथे घालवत बसलो
वृद्धांना तर आश्रमात स्मरणांची संगत आहे

कुटुंबवत्सल होण्याची वेश्येला इच्छा नाही
घरात नुसत्या नजरांनी कौमार्य दुभंगत आहे

Subscribe to RSS - बाप दिवंगत आहे