वेगळी वाट कोणी निवडलीच तर
Submitted by बेफ़िकीर on 7 May, 2014 - 02:27
वेगळी वाट कोणी निवडलीच तर
चूक पदरात घ्या वेळ पडलीच तर
लोक जगतील नुसत्या प्रती खपवुनी
ही मनाची वही मी उघडलीच तर
वास्तवे मी चिमुटभर चघळतो जरा
चव तुझ्या चुंबनांनी बिघडलीच तर
जीव ओतून सध्या टिकव दुष्मनी
मित्र होऊ पुन्हा गाठ पडलीच तर
शेर शुद्धीत यावा अशी प्रार्थना
ओळ धुंदीत कोणी खरडलीच तर
त्याच मातीतुनी शिल्प कर तू नवे
सर्व नाती जुनी जर उखडलीच तर
पूर्ण दुर्लक्ष कर, 'बेफिकिर' होत जा
रोज बाही जगाने दुमडलीच तर
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा: