हल्ली म्हणे मी सापडत नाही तुला

हल्ली म्हणे मी सापडत नाही तुला

Submitted by बेफ़िकीर on 22 April, 2014 - 13:18

हल्ली म्हणे मी सापडत नाही तुला
मी हरवणेही आवडत नाही तुला?

जखमेप्रमाणे काळजी घेतो तुझी
खपलीप्रमाणे खरवडत नाही तुला

गालातल्या गालात का हासू नये
कोडे खळीचे उलगडत नाही तुला

हे पंख कुठुनी चोरले आहेस तू
आता हवासुद्धा नडत नाही तुला

टाळी नको झाल्यामुळे टाळी मिळे
पण काम तितकेही पडत नाही तुला

काया फुलवतो पावसाळ्यांनी तुझ्या
हृदयावरी मी शिंपडत नाही तुला

इतके दरिद्री मन कसे आहे तुझे
फुकटातही मी परवडत नाही तुला

-'बेफिकीर'!

Subscribe to RSS - हल्ली म्हणे मी सापडत नाही तुला