इतक्या छोट्या आनंदांनी का हुरळावे

इतक्या छोट्या आनंदांनी का हुरळावे

Submitted by बेफ़िकीर on 20 September, 2013 - 13:19

इतक्या छोट्या आनंदांनी का हुरळावे
मोठ्या आनंदाच्यासाठी कुठे वळावे

इतके रडायचे आहे पण वेळच नाही
माझे ट्रेलर म्हणुनी हे आकाश गळावे

तिच्या मनाचा थांग अन्यथा कसा कळावा
गळ्यातले होऊन तिचे मी...घरंगळावे

स्वतःपासुनी सुटका व्हावी यासाठी मी
कुणाबरोबर कशापासुनी दूर पळावे

प्रत्येकाला भेडसावते हीच समस्या
जितकी दाबावी इच्छा तितकीच बळावे

यासाठी जपतात शील सारे केव्हाचे
योग्य माणसाकडून हे चारित्र्य मळावे

बोली मर्‍हाटमोळी माझी कविता फार्सी
पुरून घ्यावे स्वतःस की निश्चिंत जळावे

Subscribe to RSS - इतक्या छोट्या आनंदांनी का हुरळावे