विषय क्रमांक-१ : काळरात्रीनंतरचा उषःकाल
भारतमातेला जखडून ठेवणाऱ्या पारतंत्र्याच्या बेड्यांनी अस्वस्थ झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांनी भगीरथ प्रयत्न केल्यामुळे १५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्याग, बलीदानानंतर मिळालेल्या ह्या स्वातंत्र्याचे अप्रूप सगळ्या भारतीयांना होते. समाजात, राजकारणात मुल्यांची, तत्वांची चाड असलेली माणसं अजून कार्यरत होती.
प्राथमिक शाळेत शिकलेलं गणित - "गणू कडे १० आंबे होते. त्यातले ६ नासके निघाले तर गणूला किती आंबे चांगले मिळाले?" आणि मग १०-६ करुन उत्तर लिहीलं जातं "गणूला ४ चांगले आंबे मिळाले." आपल्या आजुबाजुला भ्रष्टाचारी, फक्त आणि फक्त स्व:हिताचाच विचार करणारी, स्वार्थी, सत्तांध अशी प्रत्येक क्षेत्रातली माणसं नासक्या आंब्यांप्रमाणे दिसत असताना, चांगुलपणाचा वसा घेतलेल्या माणसांमुळे मग ती भलेही हाताच्या बोटावर मोजण्या इतकी का असेनात असल्यामुळेच केवळ संपुर्ण समाज वजा भ्रष्टाचारी ह्या वजाबाकीने अजून तरी समाजात "शुन्य" अवस्था आलेली नाहीये.
ज्या देशात आपण जगतो, त्या देशाचं आपण काहीतरी देणं लागतो. ‘आपण देशासाठी असू तर देश आपल्यासाठी असेल’ ही भावना जर कृतीला चालना देऊ शकली तर काय चमत्कार घडू शकतात हे जगाला दाखवून दिलं टाटा उद्योग समूहाने. शंभरहून अधिक काळ केवळ देशाच्या प्रगतीचाच वसा घेतलेल्या या विलक्षण कुटुंबाबद्दल, उद्योग समूहाबद्दल आदर, अभिमान वाटावा तेवढा कमीच आहे. सतत दूरदृष्टी ठेवून, प्रवाहाविरुद्ध पोहत राहून प्रवाहाचीच दिशा बदलणारे ध्येयवेडे टाटा!