रस्त्यास तिचा पत्ता विचारला बर का

रस्त्यास तिचा पत्ता विचारला बर का

Submitted by बेफ़िकीर on 24 June, 2013 - 13:13

रस्त्यास तिचा पत्ता विचारला बर का
तर सरळसोट रस्ता फुशारला बर का

मी बालपणी बापाशी कुस्ती खेळे
जी बाप कालही सहज हारला बर का

हाताबाहेर कधीही गेलो नाही
आरश्यासही डोळा न मारला बर का

गीतेची शप्पथ न्यायदेवतेनेही
सत्यावरती डोळा वटारला बर का

आता सारे जग तिच्यासारखे भासे
त्याचा बिघाड इतका सुधारला बर का

हे पीक आठवांचे जगामधे गाजे
मी फक्त एक अश्रू फवारला बर का

क्षितिजापाशी शिस्तीत मेघ भरकटले
चेहरा तिने माझा चितारला बर का

'तो कधीच गेला' असे म्हणत ज्याबाबत
तो 'बेफिकीर' नुकताच वारला बर का

Subscribe to RSS - रस्त्यास तिचा पत्ता विचारला बर का