चालला आहे कशाचा खल इथे
Submitted by तिलकधारी on 16 April, 2013 - 09:37
आर्त श्वासांची किती धांदल इथे
चालला आहे कशाचा खल इथे
तेच वलयांकीत होते नेमके
वागले जे रोज उच्छृंखल इथे
बघ विठ्याने माळ माझी घातली
भक्त नाही एवढा अट्टल इथे
गप्प बसण्याचे हजारो फायदे
पण नको लढवूस ही शक्कल इथे
एवढा काटा कसा आला असा?
स्पर्शुनी गेले कुणी कोमल इथे
हे तुझ्या दारात भुरटे केवढे
काढवेना ईश्वरा चप्पल इथे
वानवा आहे सुगंधाची तुझ्या
सोड आता रेशमी कुंतल इथे
विषय:
शब्दखुणा: