संध्याकाळी
Submitted by कथकली on 9 April, 2013 - 10:49
धुंद मदिर गंधाच्या वार्यावर फिरती लाटा
अनंत तुझ्या स्मृतिंचा अंतरास सलतो काटा
जीर्ण तरूंना फुटली हिरवी कोंभ, नव्हाळी
मन वियोग व्याकुळ झाले वसंत संध्याकाळी
फिरता मानस फिरले घुटमळले अन अडखळले
तू नसता उद्यानी भरकटता पाउल मळले
मिलनास आसुसल्या सृष्टीच्या लेकीबाळी
मन वियोग व्याकुळ झाले वसंत संध्याकाळी
फुलली फुले शेजारी चित्त मुळी ना तेथे
चपल उष्ण श्वासांनी प्रेमाचे सुकले पाते
रसरशीत करवंदे भरलीत जाळी जाळी
मन वियोग व्याकुळ झाले वसंत संध्याकाळी
सखे तुझ्या व्यथेचा पळसास फुटे अंगारा
चित्तात भयाण अटवी वणवा भणाणणारा
गोड तव हाके ची कानी नाही भिकबाळी
विषय:
शब्दखुणा: