एकाच कारणाचा करते तपास दुनिया
Submitted by बेफ़िकीर on 15 March, 2013 - 01:44
एकाच कारणाचा करते तपास दुनिया
समजेचना कुणाला असते कशास दुनिया
कष्टांवरी दिनांच्या ती राहते उभी .. पण
पैशात लोळण्याला म्हणते विकास दुनिया
आपापल्या परीने जो तो जगून जातो
दुनियेस कोण कळतो कळते कुणास दुनिया
राहून अर्धपोटी तृप्तीत पाठ टेके
माझ्या लहानपणची ती दिलखुलास दुनिया
जितके तिला स्वतःला ठरतात फायद्याचे
देते तुला जगाया तितकेच श्वास दुनिया
गाठा भ्रमात तुमची उंची इमारतींनो
एका क्षणात सारी जाते लयास दुनिया
येथेच थांब तू हे नाही म्हणत तुला मी
नुसती बघून जा की माझी भकास दुनिया
धुंदीमधे स्वतःच्या घे तू जगून मित्रा
करशील त्रास तितका देईल त्रास दुनिया
विषय:
शब्दखुणा: