मला न जमले.................वनिता

मला न जमले.................

Submitted by वनिता तेंडुलकर ... on 1 February, 2013 - 03:17

उर्मी मनी असूनी, जगणे मला न जमले
रोखून आसवांना, धरणे मला न जमले

दाबून हुंदके अन् लपवूनिया उसासे
हास्यास बेगडी त्या, जपणे मला न जमले

निशिगंध माळताना, दरवळ उरात सलतो
अन् आरशास कळले, सजणे मला न जमले

मी घेतली भरारी, पाऊस झेलण्याला
मग सांग चातका का, भिजणे मला न जमले?

मी जागतेच आहे, उलटून रात गेली
डोळ्यात कैद त्याला, करणे मला न जमले

आयुष्य वेचले मी, मांडीत डाव, पण तो..
उधळून आज गेला, रुसणे मला न जमले

वाटे "नितू"स सखया, स्वप्नी तरी दिसावा
विरहात नेत्र मिटुनी, निजणे मला न जमले

Subscribe to RSS - मला न जमले.................वनिता