तुला बदनाम करणारे तुला बदनाम करताना

तुला बदनाम करणारे तुला बदनाम करताना

Submitted by बेफ़िकीर on 21 January, 2013 - 03:20

हवा होता मला आराम तेव्हा काम करताना
मिळावे काम आता वाटते आराम करताना

कपाळी कोरुनी सारे प्रयत्नांची मुभा देता
मनाचा खेळ देवांनो तुम्ही मुद्दाम करता ना

मना मोक्षाप्रती जाण्यास लाखो जन्म घालवले
तरी नाकी नऊ आले तुला निष्काम करताना

लढाई हारलो प्रत्यक्ष आयुष्यासवे माझी
इथे आभासत्या मुद्यांवरी संग्राम करताना

तुला ते श्रेय द्यावे की सबूरीला स्वतःच्या मी
पुराण्या विभ्रमांनी तू नवा परिणाम करताना

उगा हंसाप्रमाणे चालुनी झुलवायची वेणी
तुला जाणीवही नसणार कत्लेआम करताना

निसर्गाची कसोटी लागली अस्तित्व जपण्याची
ऋतू येईल जो त्याला तुझा हंगाम करताना

Subscribe to RSS - तुला बदनाम करणारे तुला बदनाम करताना