कमतरता दिलदार स्वभावाची आहे
Submitted by बेफ़िकीर on 15 January, 2013 - 08:02
कमतरता दिलदार स्वभावाची आहे
जीवनशैली ताणतणावाची आहे
नवरा होता तेव्हा त्याची होती ती
आता पत्नी सार्या गावाची आहे
पेपरमध्ये फोटो आला की विखरू
हीच मागणी क्षुब्ध जमावाची आहे
भीती पाप्यालाही आहे लोकांची
फक्त गरज निर्भीड उठावाची आहे
बाप म्हणे पाहून बंगला पोराचा
ही प्रगती माझ्याच अभावाची आहे
मिळेल त्या हृदयात घेउनी ठेवावी
जागा सध्या चढत्या भावाची आहे
शाल नारळापलीकडे किंमत नाही
'बेफिकीर'ची कविता नावाची आहे
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा: