नव्याने
------------------------------------------------------------
मांड एकदा डाव नव्याने
जगण्याचा घे ठाव नव्याने
धागे दोरे नारळ झाले
देवा आता पाव नव्याने
झाली गेली विसरुन चर्चा
लिही तुझे तू नाव नव्याने
नाकावरती रुमाल आला
म्हणजे आले गाव नव्याने
धोंड्याचा महिना आला का?
चिघळेल अता घाव नव्याने
जिंकला जरी शर्यत परवा
आज एकदा धाव नव्याने
तिने वाचले ना प्रेमपत्र
म्हणजे लिहिणे ताव नव्याने
गझला लिहिल्या जरी कितीही
अजून आहे हाव नव्याने