देव्हार्यात बसून ... (तरही)
Submitted by ज्ञानेश on 30 September, 2012 - 14:35
(दिलेल्या तरही मिसर्यात किंचित बदल केला आहे.)
============================
जगव्यापी अथवा दयाघन प्रभू त्याला म्हणावे कसे?
देव्हार्यात बसून जो ठरवतो, की मी जगावे कसे..
तो गेला अगदीच दूर, बहुधा हा सोडुनी चालला
हास्यास्पद ठरलेत आज सगळे माझेच दावे कसे?
रात्रीशी फटकून झोप असते, उत्साह होतो शिळा
ज्या स्वप्नास मुळात जन्म नसतो, ते पूर्ण व्हावे कसे?
माझा हात धरून घट्ट अगदी, जेव्हा निघालीस तू
तेव्हा मीच तुझ्याकडून शिकलो- झोकून द्यावे कसे
ह्रदयाला फुटतात रोज उकळ्या- स्वच्छंद होऊ, चला !
पोटाला बसताच एक चिमटा, कळते जगावे कसे !
विषय: