'ताई, मी कलेक्टर व्हयनू!' - श्री. राजेश पाटील

Submitted by चिनूक्स on 7 July, 2009 - 18:38

राजेश पाटील हा खानदेशातील ताडे या अगदी लहान खेड्यातून आलेला तरुण. अतिशय हलाखीत जगणार्‍या कष्टकरी कुटुंबातून आलेला राजेश शेतमजुरीचे मिळेल ते काम करून, पाव-भाजीपाला विकून, ट्रॅक्टरवर मजुरी करून, विहिरी खोदून शाळा शिकला. बर्‍यावाईट मित्रांच्या संगतीत राहून उनाडक्या केल्या, घरी भांडणं आणली, बेदम मार खाल्ला, भुरट्या चोर्‍या केल्या आणि 'एक वाया गेलेली केस' या टप्प्यापर्यंत आलेला राजेश पुन्हा भल्या मित्रांच्या संगतीमुळे आयुष्याच्या एका निर्णायक टप्प्यावर येऊन उभा राहिला. पुढे त्याला त्याची दिशा गवसली. कर्जबाजारी शेतकर्‍याचा हा व्रात्य आणि खोडकर मुलगा प्रचंड परिश्रमाच्या आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर आय. ए. एस. अधिकारी झाला!

श्री. राजेश पाटील यांनी पुणे विद्यापीठातून संख्याशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं. २००० साली भारतीय सांख्यिकी सेवा आणि हवाई दलात त्यांची निवड झाली. पुढे २००५ साली भारतीय प्रशासकीय सेवेत त्यांची निवड झाली. 'ताडे येथील राजेश पाटील - आय.ए.एस' ही बातमी वृत्तपत्रांत झळकली.

'ताई, मी कलेक्टर व्हयनु!' हे श्री. राजेश पाटील यांचं अनुभवकथन म्हणजे एका अभावग्रस्त तरुणाचा संघर्षमय प्रवास आहे. मात्र या संघर्षाबरोबरच दिसून येतो तो त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आणि सामाजिक बांधिलकीची जाण. भारतीय लोकशाहीत शासन व सामान्य माणूस यांच्यातला दुवा म्हणजे प्रशासकीय अधिकारी. एक उत्तम माणूस, आणि म्हणूनच एक उत्तम प्रशासकीय अधिकारी असलेल्या श्री. राजेश पाटील यांचं हे अनुभवकथन विलक्षण आहेच, पण परिशिष्टात असलेली श्रीमती इंदुताई पाटील (राजेशच्या मातु:श्री) व श्रीमती अलका पाध्ये (राजेशच्या शिक्षिका) यांची मनोगतंही तितकीच हृद्य आहेत.

'ताई, मी कलेक्टर व्हयनू!' या अफलातून अनुभवकथनातील ही काही पानं..

taimi.jpg

ए ताजा पाववाले...!

मला नेमके आठवत नाही, की मी पाव विकायला सुरुवात का केली? मी सहावीत असेन, म्हणजे अकरा वर्षांचा. सुरुवातीला, मी थोडे म्हणजे डझनभर पाव एरंडोलवरून आणत असे. सकाळी लवकर उठून गावभर पायपीट करत 'ए ताजा पाववाले' असे म्हणून पाव विके. एरंडोलमध्ये दोन बेकर्‍या होत्या. त्यांपैकी एका बेकरीतून मी पाव आणायचो. पाव सकाळी घेतले नाहीत तर ते संपल्याची किंवा लहान पाव विकत घेण्याची नौबत यायची. सकाळी घेतलेले पाव दिवसभर मला वर्गात वागवावे लागत. सुरुवातीला, मी पाव विकतो असे फार क्वचित कोणाला माहीत होते; परंतु लवकरच, ही खबर हळूहळू सर्व वर्गाला कळली. मला मुले 'पाववाला राजू' म्हणून चिडवू लागली. वर्गातील सर्वांना माहीत झाल्यावर माझी परिस्थिती अवघड झाली. सर्वांपासून नजर चुकवून पाव सांभाळणे अवघड होऊन बसले. मधल्या सुटीत किंवा पीटीच्या पिरीयडमध्ये मुले माझ्या पिशवीतून दोन-चार पाव घेऊन पसार होत. एखाददुसरा पाव पसार झाल्यास मला त्याचे काही वाटत नसे. पण थोडे जास्त पाव गायब झाल्यास मात्र मी अडचणीत येत असे. घरी अक्काला चोख हिशेब द्यावा लागे. तिच्यापुढे बहाण्यांना किंमत नसे. ती सर्व गोष्टींसाठी मला जबाबदार ठरवी.

पुढेपुढे, मला शाळेत दोन पिशव्या मिरवायची लाज वाटू लागली. कधीकधी, वर्गातील मुले आपापसात, माझ्याकडे बोट दाखवून फिदीफिदी हसतात असे मला वाटे. अशा वेळेला मला नकोसे वाटायचे. त्या सर्वांतून मी एक मार्ग काढला. मी विकत घेतलेले पाव संध्याकाळपर्यंत बेकरीतच ठेवू लागलो. संध्याकाळी शाळा सुटल्यावर धावत जाऊन मी पिशवी घेऊन येई; पण तेथेही, बर्‍याच वेळा बेकरी बंद झालेली असे.

शाळेतून संध्याकाळी निघून पाव एसटीने घरापर्यंत सुरक्षित पोचवणे हेही मोठे दिव्य होते. संध्याकाळी शाळा सुटल्यावर दोन्ही पिशव्या पाठीवर लादून मी स्टॅण्डचा रस्ता धरत असे. आमची शाळा संध्याकाळी पाचला सुटायची आणि आमच्या गावाला जाणारी बस साडेसहाच्या आधी नव्हती. मधल्या वेळेत मग आमचे खेळाचे डाव रंगत. माझ्या पिशवीत खेळाचे सामान म्हणजे गोट्या, विटीदांडू व एक रबरी चेंडू नक्की असायचा. स्टॅण्डच्या आजूबाजूला मुलामुलींची छोटीछोटी, वेगवेगळ्या गावांची टोळकी गप्पा मारत बसलेली असत. टोळक्यामध्ये सहसा मोठ्या व गुंड प्रवृत्तीच्या मुलांचा वरचष्मा असे. त्यांच्या फालतू गप्पा ऐकण्यापेक्षा मी जेथे खेळ चाललेला असे तेथे जाऊन हजेरी लावायचो. खेळताना आपल्या रूटच्या घोळक्यांवर लक्ष ठेवणे जरुरीचे असायचे; नाहीतर बस हुकण्याचा संभव असे.

एकदा गोट्यांचा डाव रंगला. पाचचे सहा, सहाचे साडेसहा कधी वाजले याचा थांगपत्ताच लागला नाही. माझी गाडी हुकली होती. नंतर घरी जाईपर्यंत रात्रीचे दहा वाजले. आईला मी सांगितले की, अभ्यासात भान राहिले नाही. ही सबब काही तिला पटली नाही व त्या दिवशी माझी चांगलीच 'पूजा' झाली. त्यानंतर मी जरा सावध झालो. बर्‍याचदा मी खेळण्यात एवढा हरपून जात असे की, मला माझ्या दप्तराचे, पावाच्या पिशवीचे भान राहत नसे. दप्तराच्या ढिगात असलेली माझी पावाची पिशवी लंपास करून व जेवढे हाताला येतील तेवढे पाव काढून पिशवी परत आपल्या जागेवर ठेवली जाई. मला हे घरी गेल्यावर लक्षात येई.

अक्काचे लग्न झालेले नव्हते, तोपर्यंत म्हणजे मी इयता आठवीत जाईपर्यंत माझा पावविक्रीचा व्यवसाय सुरळीत चालला. अक्का प्रत्येक दिवशी किती पाव आले, किती विकले गेले, नफा किती - उधारी किती याचा हिशोब व्यवस्थित ठेवायची व महिन्याच्या शेवटी पास काढायला, पेन-वही-इतर वस्तू घ्यायला पैसे द्यायची. पाव कमी भरल्यावर ते माझी चांगलीच हजेरी घेत असे. शेवटी आयुष्यात माझे काही होणार नाही, भविष्यात मला बायकोही सांभाळायला येणार नाही इत्यादी ताशेरे ओढल्यानंतर घटनेवर पडदा पडत असे.

मी थंडी असो वा पाऊस असो, रोज सकाळी सहा वाजता एकेका गल्लीचा रस्ता धरी. बिस्किटांच्या डब्यात एकावर एक रचलेले पाव घेऊन मी 'ये ताजा पाववाले' असे म्हणत कामाला लागे. सकाळी उठायला थोडा जरी उशीर झाला तरी माझ्या विक्रीवर परिणाम होत असे.

थंडीच्या दिवसांत सकाळी उठणे जीवावर येई. स्वेटर नावाचा प्रकार माहीत नसल्याने व विनाचप्पल हिंडावे लागत असल्याने त्यां दिवसांत खूप त्रास होई. ओरडताना फाटलेल्या ओठांतून रक्त निघे. गारठलेले हात पावाचा गारगार डबा धरायला नको म्हणत. भुरूभुरू वाहणारा थंड वारा सकाळी अंगाला झोंबे. छोटे छोटे दगड पायाला टोचत व भेगाटलेल्या पायातून कधीकधी रक्त निघे. बर्‍याचदा उठताना अंगाला काटे येत! उन्हाळ्यात दिवसा जरी खूप तापत असले तरी सकाळी फिरण्यात व थंड-फोफाट्यात पाय ठेवून चालण्यात खूप मजा येई.

छोट्याशा गावात रोज पाव घेणारी काही ठरावीक घरे होती. कोणत्या घरात लहान मूल आहे, कोणत्या घरातील मुले खूप हट्टी आहेत किंवा कुणाकडे पाहुणे म्हणून लहान मुले आली आहेत, यांवर मला नजर ठेवावी लागे. अशा घरांमध्ये माझी विक्री होई. मी मुद्दाम अशा घरांजवळ रेंगाळत असे व तिथे दोन-तीनदा सर्वांना ऐकू येईल अशा आवाजात ओरडत असे.

बर्‍याचदा सुट्या पैशांचा वांधा होई. कारण माझा एक पाव पंचवीस पैशाला विकला जाई. काही महाभाग मुद्दाम दहाची, वीसची किंवा शंभराची नोट दाखवत. काही माझी नेहमीची गिर्‍हाईके माझ्याकडून उधारीत घेत. मात्र पैसे देताना ती मंडळी नाकीनऊ आणत. बरेच जण तर बदलून जात व त्यांनी कधी पाव घेतले हेसुद्धा त्यांना आठवत नसे. काही मुद्दाम लबाड बोलत. अशा वेळी माझ्यापुढे काही मार्गच राहात नसे.

बरेच जण माझ्याकडे बोट दाखवून आपल्या मुलांना सांगत, 'देखां तो पोरग्या, पाव ईकिसन, शाया करस'. अशा वेळेला मला आकाश ठेंगणे वाटे. मात्र बरीच उनाड मंडळी माझी टिंगलही करत. पाव विकल्याने माझ्या प्राथमिक गरजा भागू लागल्या. अक्काचं लग्न होईतोपर्यंत ती माझा हिशोब चोख ठेवत असे. नंतर मात्र माझ्यावरील नियंत्रण कमी झाले. प्रत्येक दिवशी मी कितीचे पाव आणतो व कितीचे विकतो, याची चौकशी करण्यास ताई-अण्णांना वेळ नव्हता आणि मी सर्व व्यवस्थित सांभाळीन असा त्यांना विश्वास वाटत असावा.

आणि त्याच दरम्यान मला जुगाराची सवय लागली. सुरुवातीला मी उत्सुकतेपोटी जुगार खेळू लागलो. त्यानंतर एका विशिष्ट पैशांमधून मी उलटापालट करून खेळायचो; परंतु शेवटी मी पावाच्या पैशांमधून जुगार खेळायला लागलो. कधीकधी तर माझ्याकडे पाव घ्यायलाही पैसे राहत नसत. अशा वेळी माझी फार पंचाईत होई. सुरुवातीला माझा हा पराक्रम ताई-अण्णांपासून लपून राहिला; पण एकदोनदा त्यांनीच मला रंगेहात पकडल्याने शंका राहिली नाही. जेव्हा जेव्हा मी जुगार खेळल्याची बातमी ताईला लागे, तेव्हा ती माझा चांगलाच समाचार घेई. गावातील जुगारी लोकांच्या संसाराचा कशा प्रकारे नाश झाला याचा दाखला देऊन ती मला समजावण्याचा प्रयत्न करी. परंतु तरीही माझी सवय काही केल्या जाईना. पुढे, माझ्या खर्चाची संपूर्ण जबाबदारी जेव्हा माझ्या पावावरील पैशांवर आली तेव्हा मी जरा सावरलो. तरीही माझे जुगार खेळणे बंद होत नव्हते.

माझा हा उद्योग नववीपर्यंत सुरू राहिला. दहावीत गेल्यावर ताई-अण्णांनी माझे पाव विकणे बंद केले. पैशांची आवक बंद झाल्याने माझे जुगार खेळणे आपोआप संपले.

जुगाराबरोबर मला अजून एक वाईट सवय लागली आणि ती म्हणजे शाळा बुडवून व्हिडिओच्या दुकानात जाऊन व्हिडिओ बघण्याची. मी जेव्हा पाव विकत नसे तेव्हा माझ्याकडे अजिबात पैसे नसत. ताई वर्षाच्या सुरुवातीला एक रुपया द्यायची, त्याचा उपयोग मला अडचणीच्या वेळी करायचा असे. चुकून गाडी पंक्चर झाली किंवा आलीच नाही, अशा वेळेस मी ते पैसे वापरत असे. वेळोवेळी तो रुपया मला ताईला दाखवावा लागे.

त्यामुळे जेव्हा माझ्याबरोबरची इतर मोठी मुले शाळा बुडवून सिनेमाला जात, तेव्हा माझी फार घालमेल होई; परंतु मला कधीकधी संधी मिळत असे. जेव्हा त्या मुलांना सोबत मिळत नसे तेव्हा तिकिट काढायच्या अटीवर मी त्यांच्याबरोबर जाई. एकदा तर गंमतच झाली. आम्ही शाळेला बुट्टी मारून गल्लीतून लपतछपत जात सिनेमा हॉल गाठला. चोरट्या मांजरीसारखे आजुबाजूला बघून हळूच हॉलमध्ये प्रवेश केला आणि अंधारात मागच्या बाकड्यावर जाऊन बसलो. थोड्या वेळानंतर आजुबाजूच्या व्यक्ती दिसू लागल्या. माझ्या शेजारी बसलेली व्यक्ती कोण आहे हे कळल्यावर माझे सात गेले आणि पाच राहिले. शेजारी माझा चुलतभाऊ नाना बसलेला होता. त्याने मला दमदाटी करून घरी ताईला सांगण्याविषयी धमकी दिली. माझी तर बोलतीच बंद झाली होती; परंतु नानाने घरी काहीच सांगितले नाही. त्यामुळे नानाचेही बिंग फुटले असते ना! तेरी भी चूप मेरी भी चूप!

पाव विकल्यामुळे माझ्या हातात पैसे खेळू लागले. माझी सिनेमा बघण्याची सवय वाढत गेली. दुसर्‍याच्या पैशानी सिनेमा बघणारा मी, दुसर्‍यांना स्वतःच्या पैशांनी सिनेमा दाखवू लागलो. तो बघून झाल्यावर मात्र अपराध्यासारखे वाटे. मी देवाची प्रार्थना करी की, माझा पराक्रम ताईला कळायला नको व मी परत अशी चूक करणार नाही! परंतु हे चक्र कधी थांबत नसे.

पैसे नसताना पैसे मिळवण्यासाठी मला वेगवेगळ्या क्लृप्त्या कराव्या लागत. सहसा मी घरात पैसे कुठे ठेवले जातात याची बित्तंबातमी ठेवत असे. मग संधी साधून त्यांतले काही पैसे कुणाला कळू न देता लांबवत असे. शेवटी पैशांचा हिशोब बर्‍याचदा चुकल्याने घरातल्या मंडळींना माझा संधय आला व माझ्यावर नजर ठेवण्यात येऊ लागली.

परंतु मी जास्त चतुराईने चोरू लागलो. माझी बहीण अक्का एका छोट्याशा डब्यात तिचे पैसे ठेवत असे. तिचा तो डबा नाण्यांनी भरलेला असे. त्यामधून एखाददुसरे नाणे लंपास करणे तेवढे अवघड नव्हते. बर्‍याचदा आम्ही भातखेड्याला सकाळी भाजीपाला विकण्यासाठी जात असू. चालणे सकाळी सहा वाजता सुरू करून, ओझे घेऊन तीन किलोमीटरवरील भातखेडा गाठावे लागे. अक्काजवळ सहसा कांदा, मेथी, मुळा, पोकळा वा मिरचीचे टोपले असे. भाजी विकून झाल्यावर आम्ही अक्काच्या एका मैत्रिणीच्या घरी थांबायचो. त्यांच्या गप्पा रंगल्या की मी हळूच तिच्या डब्यातून पैसे लंपास करी, परंतु जर मैत्रिणीच्या घरी जाण्याआधीच पैसे मोजलेले असले तर मात्र माझी डाळ शिजत नसे.

मी जेव्हा अण्णांबरोबर माहिजीच्या आठवडाबाजारात भाजीपाला घेऊन जाई, तेव्हा मी पैसे लंपास करत असे. आमच्या दुकानाची जागा मध्यभागी होती, तेथे बर्‍याचदा खूप गर्दी व्हायची. अण्णा गिर्‍हाईकाला भाजीपाला मोजून देत व मी पैसे घेण्याचे काम करी. गोणीच्या दुमडलेल्या घडीमध्ये दोन कप्प्यांमध्ये पैसे ठेवायची व्यवस्था होती. अण्णा पाचच्या नोटा माझ्या वरच्या खिशात ठेवण्यासाठी देत. शेवटी, एकूण किती नोटा माझ्या खिशात आल्या आहेत हे काही त्यांच्या लक्षात येत नसे. त्यामुळे जेव्हा आमच्या दुकानासमोर गिर्‍हाईकांची गर्दी होत असे तेव्हा अण्णांची नजर चुकवून मी पाचची एक नोट वरच्या खिशातून खालच्या खिशात ठेवत असे. बाजार सुरू व्हायच्या आधी अण्णा मला शंकराच्या हॉटेलात शेवचिवड्याचा भत्ता खाऊ घालत. तो मला खूप आवडे. या सर्व कारणांमुळे मला माहिजीला जायला खूप आवडे. शाळा बुडत असली तरी मी त्या बाजाराची वाट पाहत असे.

पैसे लाटण्याच्या माझ्या काही सवयी इतक्या जगावेगळ्या होत्या, की चुकूनही, कुणाच्या मनात माझ्याविषयी संशय येऊ शकत नव्हता, खानदेशात लग्नामध्ये किंवा तत्सम कार्यक्रमांत निमंत्रण देणार्‍या पार्टीला भेट म्हणून काही पैसे देण्याची प्रथा आहे. इतर ठिकाणीही पाकिटात काहीतरी पैसे ठेवून देताना मी बघितले आहे. प्रथा कुणीही सुरू केली असली तरी ती मला चांगली वाटते, कारण त्याद्वारे लग्न करणार्‍या व्यक्तीचा अंशतः का होईना पण खर्च भरून निघतो. त्या काळात तर माझ्यासाठी ती प्रथा वरदानच ठरली! त्या प्रथेला अहिराणीत 'पैसे वाजवणे' असे म्हणतात. ताई-अण्णा जेव्हा केव्हा लग्नाला जाताना माझ्या हातात पैसे वाजवण्यासाठी पाचची किंवा दहाची नोट ठेवत, तेव्हा माझा आनंद गगनात मावत नसे. मी त्या लग्नाला किंवा नवसाला न चुकता उपस्थित राहत असे. किंबहुना जेवण झाल्याशिवाय हलत नसे; परंतु वाजवण्यासाठी दिलेले पैसे गुपचूप खिशात घालत असे. खूपच झाले तर पैसे घेणार्‍या मंडळाजवळ ओळखीच्या काही व्यक्तींना दिसेल अशा आविर्भावात गर्दी करत असे. उद्देश एवढाच, की पैसे वाजवले वा न वाजवले तरी ताई-अण्णांना पडताळणी करायला काही मार्ग नव्हता. माझे हे गुपित मी कधीही कुणाला कळू दिले नव्हते.

हे सर्व उपद्व्याप करूनही माझ्याकडे पैसे राहत नसत. अशा वेळी मी छोट्यामोठ्या चोर्‍या करत असे. मी शेतामधून रबरी पाईप गायब करत असे. साधारणतः कुणालाही संशय येणार नाही अशा रीतीने घडी करून पाईप एरंडोलला नेऊन भंगाराच्या दुकानात विकत असे. त्यात मला बर्‍यापैकी पैसे मिळत. मी ते जुगारासाठी, सिनेमा बघण्यासाठी वापरत असे. ते काम मला खूप सावधानतेने करावे लागे, परंतु नेहमीच्या सवयीने मला चांगली सफाई आली होती.

आई सत्यवादी असल्यामुळे जेव्हा कधी चोरी केल्याची खबर तिला मिळे, तेव्हा तिच्या तळपायाची आग मस्तकाला भिडे. अशा वेळी दुर्दैवाने जर मी तिला सापडलो तर मात्र माझी खैर नसे. ती हातात येईल त्या वस्तूने माझी मनसोक्त पिटाई करायची व पुन्हा चोरी न करण्याची बोली वदवून घेई. मीही पुन्हा तसे न करण्याचा निश्चय करत असे, परंतु माझा हा निर्धार दुसर्‍या दिवसाचा सूर्य क्वचितच बघत असे.

वाटचाल सुरू झाली

संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी माझा प्रवास पुण्याहून सुरू झाला. विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयात अभ्यास करणार्‍या मुलांकडून मला बर्‍याच गोष्टी कळल्या. त्या वेळेस विद्यापीठ आवारात प्रवीण चव्हाण नामक परीक्षेचा माजी विद्यार्थी खेर वाङ्मय भवनाच्या रिकाम्या वर्गांमध्ये मार्गदर्शन वर्ग चालवत असे. मी जसा वेळ मिळेल तसा त्या वर्गामध्ये जाऊन बसू लागलो. तेथील मुलांची तयारी बघून, त्यांच्याकडील अभ्यासाची सामग्री बघून मला कसेसे होत असे. मी नवखा असल्यामुळे मला सहसा कोणी काही देत नसे. त्या वेळेस माझे एम.एस्सी. होऊन मी नुकतेच जे.आर.एफ. (Junior Research Fellowship) घेऊन एम.फिल.ला दाखल झालो होतो. इतर मुलांना अभ्यास करताना बघून माझी घुसमट होत असे, कारण मला पुरेसा वेळ मिळत नसे. माझे मार्गदर्शक राजर्षी सर माझी द्विधा मनस्थिती जाणत असूनही माझ्यासाठी खूप काही करू शकत नव्हते.

आम्ही संशोधन करणारी मंडळी जेव्हा मासिक वेतन मिळवण्यासाठी लागणार्‍या पत्रकावर सही करण्यासाठी आमच्या मार्गदर्शकांकडे जात असू तेव्हा खूप मजा येई. कारण मार्गदर्शक कामात काही प्रगती न झाल्यास सही देत नसत. त्यामुळे महिना समाप्तीच्या पाच दिवस आधी आम्ही कामाला लागत असू व काहीतरी वाचून मार्गदर्शकांपुढे ठेवत असू. त्यांचा मूड बघून हळूच आम्ही सह्या घेत असू. त्या दरम्यान अभ्यासाबरोबर आमचे सर्व उद्योग चालत असत. हसण्याखिदळण्यात व मिस्किलपणे मुलामुलींवर व प्राध्यापकांवर कॉमेंट करण्यात आमचा बराचसा वेळ जात असे. उरलेल्या वेळात पुस्तकांची आवराआवर, झोप व वेळ मिळालाच तर विभागात आयोजित व्याख्यानाला आम्ही बसत असू. विभागात घडणार्‍या प्रत्येक घटनेचा आम्ही मनमुराद आनंद लुटत असू. आम्हां सर्वांना तेव्हा नवीन आलेल्या विद्यार्थ्यांना शिकवावे लागे व त्यांचे मार्गदर्शक म्हणून काम करावे लागे. त्यामुळे नवीन आलेल्यांमध्ये कोण कशी आहे? याविषयी चर्चा करण्यात जात असे. तासातासाला आम्ही चहाच्या निमित्ताने ओपन कॅण्टिनला बसत असू व संशोधन सोडून पृथ्वीवरील सर्व गोष्टींवर चर्चा करत असू. मी आय.ए.एस.ची परीक्षा देणार आहे व सध्या मार्गदर्शक वर्गात दाखल झालेलो आहे हे माहीत झाल्यावर मंडळी बर्‍याचदा त्यावरून माझी खिल्ली उडवत. त्यांच्यापैकी मिस्किलपणे बोलणारा जलिल व शब्दाशब्दाला खोड्या करणारा व सर्व प्राध्यापकांची नक्कल करणारा संभाजी शेडाळे अफलातून होते. अशातही मी आतील तांडवामुळे बर्‍याचदा काही करता येत नाही व आपली वाटचाल योग्य दिशेने होत नाही म्हणून अस्वस्थ राहत असे.

असेच तीन महिने कुठे निघून गेले, काही कळलेच नाही! मी दिलेल्या भारतीय सांख्यिकी सेवेच्या (ISS) परीक्षेत उत्तीर्ण झालो आणि माझी मुलाखतीसाठी निवड झाली. मला मुलाखतीला लोकसेवा आयोगामध्ये दिल्लीला जावे लागणार होते. कधी विचारही केलेला नव्हता की, आपल्याला कधीतरी दिल्ली बघायला मिळेल! माझ्याबरोबर माझ्या एका वरिष्ठाचीही मुलाखतीसाठी निवड झालेली होती, त्यामुळे माझी काळजी कमी झाली. नंतर त्याने तिकीट, राहणे याविषयी व्यवस्था केली. मी आयुष्यात पहिल्यांदा आरक्षित डब्यातून प्रवास केला! त्यापूर्वी तेवढी ऐपत नव्हती. आरक्षित व अनारक्षित यांमधील फरकसुद्धा महत्त्वाचा असायचा. बर्‍याचदा सैन्यदलाच्या मुलाखतींना जाताना ते आरक्षणाचे पैसे देत असूनही मला तिकीट काढायला पुरेसे पैसे नसल्यामुळे अनारक्षित डब्यातून जाणे भाग पडत असे. एकदा बंगलोरहून मुलाखत देऊन मी हैदराबादमार्गे नागपूरला गेलो होतो. कुणा एका रॅलीमुळे सिकंदराबाद स्टेशनवर गर्दीचा महापूर लोटला होता. माझ्याबरोबर हजारोंनी लोक नागपूरला येणार्‍या गाडीत चढले. रात्रभर एका पायावर उभे राहून प्रवास केला. त्यावेळेस मोठी बहीण अक्का नागपूरला राहत होती. पुढे नोकरी मिळाल्यानंतरही मला सर्वसामान्य डब्यात प्रवास करायला आवडत असे, कारण तेथेच खर्‍या भारताचे दर्शन होते.

प्रशिक्षणानिमित्त वातानुकूलीत डब्यात प्रवास करण्याची संधी मिळाली. तेथील नि:शब्दता, एकमेकांबरोबर न बोलणे मला विचित्र वाटत असे. ही व्यवस्था आपल्यासाठी नाही याची जाणीव होत असे. त्यामुळे माझे सर्व सहकारी वातानुकूलित डब्यात प्रवास करत असताना मी सर्वसाधारण डब्यातून प्रवास करीत असे.

आम्ही दिल्लीमध्ये एका खासदाराच्या घरी उतरलो होतो. तेथून जवळच संघ लोकसेवा आयोग असल्यामुळे आम्हाला फार अडचणी आल्या नाहीत. तेथे आमच्याबरोबर अनेक जण पडिक होते. खासदारांपेक्षा त्यांची काळजी घ्यायला असलेल्या स्थानिक व्यक्ती तेथे हक्क बजावताना दिसत होत्या. कसातरी मुलाखतीचा दिवस आला. मुलाखत माझ्यासाठी नवीन नसली तरी संघ लोकसेवा आयोगासमोर मी पहिल्यांदा येत होतो. मनामध्ये भीती दाटलेली होती, परंतु त्याच दिवशी मुलाखत द्यायला आलेल्या इतर लोकांकडे बघून व त्यांच्याशी बोलून हलके हलके वाटू लागले. त्यांच्यात तामिळनाडूहून आलेला व लुंगी परिधान केलेला नागाचंद्रनही होता. माझी मुलाखत कशी झाली व संपली ते मलाच कळले नाही. एक महिन्यानंतर निकाल आला व माझी निवड झाली! भरपूर आनंद झाला होता. तूर्त तरी माझ्या समस्यांचे समाधान मला मिळाले. मला सर्व आर्थिक समस्या सोडवता येणार होत्या व माझ्या आय.ए.एस.च्या तयारीलाही लागता येणार होते.

आईवडिलांना वेगळेच समाधान होते, शिक्षणानंतर कोणाचेही पाय न धरता आपल्या मुलाला एवढी मोठी सरकारी नोकरी मिळाली! गावात चर्चा सुरू झाली. सुरुवातीला प्रत्येकाचा अंदाज होता की, मला कोणाचातरी वरदहस्त लाभलेला आहे. त्याशिवाय एवढी मोठी नोकरी मिळूच शकत नाही. काही जणांच्या मते, मुलगी देण्याच्या आमिषाने कोणीतरी मला लावून दिले असावे. अशा प्रकारच्या घटना घडत असल्यामुळे असा अंदाज बांधणे साहजिक होते. हळूहळू धूळ जमिनीवर बसली आणि खरे काय ते स्पष्ट होऊ लागले. माझ्या नोकरीमुळे सर्वात मोठे समाधान जर मला कोणते मिळाले असेल तर ते तरुण मुलांमध्ये निर्माण झालेल्या आत्मविश्वासाचे आहे. माझ्या तेव्हाच्या निवडीनंतर व पुढे आय.ए.एस. झाल्यानंतर उत्साहाचे जे वातावरण गावातील व परिसरातील तरुण मुलांमध्ये निर्माण झाले, त्याने मला खूप समाधान लाभले. गावातील, बोटांवर मोजण्याएवढ्या का होईनात, मुलांचा तरी प्रामाणिक प्रयत्नांवर, मेहनतीवर विश्वास बसला आणि नंतर त्यांना काहीतरी करण्याची प्रेरणा लाभली.

मला प्रशासकीय सेवेत आल्यावर माझ्या गावातील लोकांसाठी खूप काही करता येईल अशी धारणा होती. किंबहुना माझे क्षेत्र निवडण्यामागे तसे करता येईल हे एक मोठे कारण होते, पण नंतर मला कळून चुकले, की लोकांचा उद्धार करणे किंवा त्यांचे विचार बदलवणे पाहिजे तेवढे सोपे नाही, मग ते एक लहान गाव का असेना! नंतर हळूहळू मला माझी भूमिका स्पष्ट होत गेली. आपल्याला दूर कुठेही नोकरी करून गावातील तरुण पिढीसाठी काम करता येईल, त्यांना चांगले काम करण्यासाठी- चांगल्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी प्रोत्साहित करता येईल. सामाजिक क्षेत्रातील नवीन विचार, शेतीसंबंधी नवीन तंत्रज्ञान, नव्या वाटा अंगीकारण्यासाठी मार्गदर्शन करता येईल याची खात्री झाली. शिक्षण, आरोग्य आणि शेती यांसंबंधी प्रचलित नवीन विचार, तंत्रज्ञान लोकांपर्यंत पोचवता येतील असा विश्वास निर्माण झाला.

लोकांच्या अपेक्षांना मात्र मर्यादा नाहीत. माझ्या निवडीनंतर आपल्या गावातील काही युवकांना तरी नोकरी मिळू शकेल अशी त्यांची अपेक्षा होती. शिवाय, मी घरातील खाजगी तंट्यांपासून स्थानिक राजकारणातील तंट्यांपर्यंत सर्व बाबतींत हस्तक्षेप करू शकतो व सोडवू शकतो असे त्यांना वाटते.

कधी कधी, चांगल्या किंवा वाईट घटनांची शृंखलाच सुरू होते. एका मागोमाग एक घटना घडत जातात. माझी भारतीय सांख्यिकी सेवेत निवड झाल्यानंतर अवघ्या एका महिन्यात मी आय.ए.एस.ची पूर्वपरीक्षा केवळ जुजबी अभ्यासाने पास झालो. त्याआधी चार महिन्यांपूर्वी वायुदलात निवड झालेली होती आणि कनिष्ठ संशोधन शिष्यवृत्तीही (जे.आर.एफ.) मिळालेली होती, पण त्याच्या फक्त एक वर्ष आधी माझी अवस्था वाळवंटातील पाणी शोधणार्‍या जनावरासारखी होती. मी आयएएसच्या पूर्वपरीक्षेत पास झालो आणि त्यानंतर दहा दिवसांत लगेच मला संख्याशास्त्र संस्थेत नोकरीवर रुजू होण्याचे पत्र मिळाले. माझी तारांबळ उडाली. एका बाजूला, मी हृदयाशी घट्ट बांधून ठेवलेले स्वप्न साकार होण्यासाठी पहिली पायरी पार केली होती तर दुसर्‍या बाजूला तोपर्यंतच्या आयुष्यातील सर्व समस्यांचे निवारण करण्यासाठी मला नोकरीरूपाने संजीवनी मिळत होती. घाईघाईने, मी माझ्या पुणे विद्यापीठातील शिष्यवृत्तीला राजीनामा दिला आणि मित्रमंडळींसह विभागाला रामराम ठोकला.

मला आयएएसच्या मुख्य परीक्षेसाठी संख्याशास्त्राबरोबर अजून एक वैकल्पिक विषय घ्यायचा होता. वाङ्मयाच्या आवडीमुळे व आजुबाजूच्या वातावरणामुळे, मी मराठी वाङ्मय हा विषय मुख्य परीक्षेसाठी वैकल्पिक विषय म्हणून निवडला. संग्रामही माझ्याबरोबर शेवटच्या काही दिवसांत विद्यापीठात राहत होता. त्याच्याही डोक्यात आय.ए.एस.व्हायचे खूळ घुसले होते. तो मराठी वाङ्मयाच्या अभ्यासवर्गाला जात असे. त्या गोष्टीचाही प्रभाव माझ्या विषय निवडण्यावर झाला. खरेतर, त्यावेळेस माझ्याजवळ दुसरा काही पर्याय नव्हता आणि इतर विषयांची चौकशी करणे व अभ्याससामग्री मिळवणे मला शक्य नव्हते. अशा रीतीने निवडक अभ्याससामग्रीसह मी नव्या नोकरीवर रुजू होण्यासाठी दिल्लीचा रस्ता धरला.

दिल्लीला जायच्या आधी मला कळले की, मी मुख्य परीक्षा देण्यासाथी काही दिवसांचा वेळ मागू शकतो. मला जरा बरे वाटले. माझा चुलतभाऊ, बापूला घेऊन मी जळगावला गेलो व तेथून सांख्यिकी व कार्यान्वयन मंत्रालयात प्रशिक्षण विभागातील अधिकार्‍यांशी त्यासंबंधी बोललो. अपर सचिव हा त्यांचा हुद्दा कळल्याने मी त्यांच्याशी आदराने बोलात होतो. ते जे काय म्हणतील त्याला फक्त ’येस सर येस सर’ म्हणत होतो. नंतर नोकरीत दाखल झाल्यानंतर कळले की, अपर सचिव म्हणजे पाण्यातील सर्वात छोटा मासा असतो. खूपच विनवणी केल्यावर, त्याने मला एका महिन्यानंतर रुजू होण्याची परवानगी दिली. मला मुख्य परीक्षा संपेपर्यंत वेळ पाहिजे होता. मी पुण्याला परतलो व अभ्यासाला लागलो. अभ्यास करता करता मला एकेक नवीन गोष्टी कळत होत्या. अभ्यासक्रमातील सर्व भाग एकदातरी वाचून होईल किंवा नाही याची शंका होती. माझी मलाच लाज वाटत होती. शिवाय, माझ्याजवळ वाचनाची सर्व सामग्री नसल्यामुळे मला अडचणी येत होत्या.

एक महिना कुठे निघून गेला त्याचा पत्ताही लागला नाही. महिन्याच्या शेवटी मी पुण्याहून थेट दिल्लीला जाऊन तेथे नोकरीसाठी दाखल झालो. देशाच्या वेगवेगळ्या भागांतून आलेले यशस्वी उमेदवार मोठ्या ऐटीत वावरत होते. तेथील वातावरण खूपच आरामाचे होते. प्रशिक्षण नावाला होते. अधूनमधून एखादा जुना अधिकारी येत असे. विषय सोडून भलत्याच विषयावर, वेळेचे भान न ठेवता बोलत असे. बर्‍याचदा, वक्ते नोकरीविषयी सर्व नकारात्मक गोष्टी सांगत व अशी जाणीव करून देत की, तुम्ही ही नोकरी स्वीकारून स्वतःचे, खूप मोठे नुकसान करून घेतले आहे. क्वचितच एखादा चांगला अधिकारी आम्हांला प्रशिक्षणकाळात भेटला.

मला खूपच चुकल्या चुकल्यासारखे वाटत होते. माझ्या मनात राहून राहून फक्त आय.ए.एसच्या मुख्य परीक्षेचा विचार घोळत असे. खूपच घुसमट होत होती. काय करावे ते कळेना. माझ्या एका वरिष्ठ सहकार्‍याने कोणत्यातरी बहाण्याने सुटी घेऊन परीक्षेचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला. त्याच्या म्हणण्याप्रमाणे, मी परीक्षा संपल्यावरच नोकरीत दाखल व्हायचे होते. मी दोन दिवस विचार केला. आय.ए.एस. होणे हेच माझ्या आयुष्याचे एकमात्र ध्येय झाले होते. त्यासाठी मी काहीही करायला तयार होतो. शेवटी, काही सहकार्‍यांच्या सल्ल्यानंतर मी आई आजारी असल्याचा बहाणा करून घरी जावे व तेथून स्वतः आजारी असल्याविषयी कळवावे असे ठरले. ठरल्याप्रमाणे, एक खोटी तार आली. तिचा आधार घेऊन मी दोन दिवसांची सुट्टी मागितली. दरम्यानच्या काळात माझी व अजून माझ्या एका मराठी सहकार्‍याची, जुनेद फारुकीची राहायची व्यवस्था झाली होती. मराठे म्हणून पुण्यातील एका सज्जन गृहस्थांच्या सरकारी निवासात आम्ही त्यांच्याबरोबर राहू लागलो.

तूर्त तरी अभ्यासासाठी व्यवस्था झाली होती. परंतु माझे मन स्थिर नव्हते. नेहमी भीती वाटत असे, की आपल्या विरुद्ध कारवाई झाली तर? आपली नोकरी गेली तर काय होईल? या सर्व विचारांनी मी विचलीत होत असे. शिवाय, माझ्याजवळ अभ्यासाची पुरेशी सामग्री नव्हती, पैशांची कमतरता होती. तरी मी रात्रंदिवस अभ्यास करीत होतो. चुकून मनात शंका येत असे की, या नोकरीमुळे आपल्या आय.ए.एस. बनण्याच्या स्वप्नावर पाणी फिरवावे लागेल, ती परीक्षा पास होणे आपल्याला शक्य नाही. दरम्यान, ऑफिसकडून मला तातडीचे एक पत्र आले व त्यानुसार मला नोकरीवर ताबडतोब रुजू व्हायचे होते. मी घाबरून गेलो. परत फिरणे शक्य नव्हते, कारण नोकरी गेली तर मी दुसरे काहीतरी करेन, परत पुण्याला जाऊन संशोधन करण्यासाठी प्रवेश घेईन. परंतु मी परीक्षा देईन. ऑफिसमधील अधिकार्‍यांनीही मला वठणीवर आणायचे ठरवले होते. त्यांनी बापूने, माझ्या चुलत भावाने पाठवलेले मेडिकल सर्टिफिकेट स्वीकारले नाही व त्याऐवजी माझ्यावर शिस्तभंगाची कारवाई सुरू केली.

माझी मानसिक स्थिती विचित्र झाली होती. काय करावे ते कळेना. तशाच अवस्थेत मी आय.ए.एसची मुख्य लेखी परीक्षा दिली. जुजबी अभ्यासामुळे, परीक्षेत माझे प्रदर्शन जेमतेम ठरले. अजून एक गंमत झाली. परीक्षेसाठी आलेल्या एका वरिष्ठांशी माझे बोलणे झाले. त्यांच्या म्हणण्यानुसार परीक्षा देण्याअगोदर आपल्या कार्यालयाला कळवणे गरजेचे असते. तसे न झाल्यास आपला प्रयत्न निरर्थक ठरतो आणि कार्यालय आपली उमेदवारी रद्द करण्याविषयी संघ लोकसेवा आयोगाला कळवू शकते. माझ्या पायाखालची जमीन सरकली! एवढ्या प्रयत्नानंतर मी परीक्षा देत होतो आणि माझा प्रयत्न निरर्थक जाणार हे ऐकून मी काही क्षणांसाठी स्तब्धच झालो. काय करावे ते सुचेना. माझ्यापुढे पर्यायही नव्हता. तशाच मनस्थितीत मी राहिलेले पेपर दिले.

मी पुन्हा कामावर रुजू झाल्यावर ऑफिसमध्ये लोक एखाद्या चोराशी असावी तशी वर्तणूक माझ्याशी करत. मलाही अपराध्यासारखे वाटत होते, परंतु त्यांनीच मला अपराध करायला भाग पाडले होते. कारण त्यांना मला परीक्षेनंतर रुजू व्हायची परवानगी देणे सहज शक्य होते. परंतु त्यांनी तसे न केल्याने मला वाकड्या मार्गाने जाणे भाग पडले. माझ्या अनुभवावरून मला दिसले की, कुणी प्रयत्न करत असला व आयुष्यात पुढची पायरी गाठू पाहात असला की त्याच्या आजुबाजूच्या बर्‍याच लोकांना ते सहन होत नाही. किंबहुना, ते मदत करण्याऐवजी त्याला विरोध कसा करता येईल व आडकाठी कशी आणता येईल याचा प्रयत्न करतात. सरकारी चाकर्‍यांमध्ये आय.ए.एस.ला जेवढा मान असतो, अधिकार असतात तेवढे इतर तांत्रिक नोकर्‍यांमध्ये नसतात. बर्‍याचदा आय.ए.एस.चा संबंध भ्रष्टाचार, मिथ्या अभिमान या गोष्टींशी जोडला जातो. त्यामुळे उच्चपदस्थ इतर नोकर्‍यांमधल्या अधिकार्‍यांमध्ये त्यांच्याविषयी द्वेषाची भावना असते. माझ्या प्रशिक्षणाधिकार्‍यांचीही तीच समस्या होती. महाशयांनी स्वतः परीक्षेत बर्‍याचदा अयशस्वीपणे आपले भविष्य अजमावलेले होते. त्यामुळे त्यांना आय.ए.एस. या शब्दाविषयीच भयंकर चीड होती. म्हणून मी जेव्हा परीक्षा देण्यासाठी गैरहजर राहिलो हे त्यांनी ऐकले तेव्हा त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला पोचली. याला कोणत्याही परिस्थितीत शिक्षा करायची या उद्देशाने त्यांनी कारवाई सुरू केलेली होती. मी कसाबसा रुजू झालो. माझे वेतन काही दिवसांसाठी बंद झाल्यामुळे मी परत तीन-चार महिने आर्थिक अडचणीत घालवले.

अपेक्षेनुसार, मी मुख्य परीक्षेचा अडथळा पार करू शकलो नाही. मला पास व्हायची आशा नव्हतीच, परंतु मनात कुठेतरी पास होईन असेही वाटत होते. निकाल लागला तेव्हा मी माझ्या ऑफिसमधील पायाभूत अभ्यासक्रमासाठी मसुरीला होतो. आम्हाला प्रशिक्षणासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागत असे. दरम्यान, आम्ही मुंबई, भोपाळ, इंदूर, हैदराबाद, कोलकाता इत्यादी ठिकाणी जाऊन आलो. शिवाय, दिल्लीला राहत असताना मी स्वतःच्या हाताने स्वयंपाक करत असे. या सर्व गोष्टींमुळे अभ्यासाची ओढाताण होई. मी जेवढा वेळ मिळेल, जेथे मिळेल तेथे वाचनाचा प्रयत्न करत असे, परंतु समाधानकारक अभ्यास होत नसे.

मसुरीला असतानाच मी पुन्हा प्रयत्न सुरू केला व पूर्वपरीक्षा दिली. मुख्य परीक्षेचा निकाल व पुढच्या वर्षाची पूर्वपरीक्षा यांत दोन महिन्यांचा कालावधी असतो. पूर्वपरीक्षा मी संख्याशास्त्र या माझ्या विषयात देत असल्यामुळे व आधीच्या वर्षी जुजबी अभ्यासाने पास झालो असल्यामुळे मला तिची फार काळजी वाटत नसे. परंतु मी त्या परीक्षेला पुरेसे महत्त्व न देण्याची जी चूक यावेळी केली, त्यासाठी मला खूप मोठी किंमत मोजावी लागली. माझ्या फाजिल आत्मविश्वासामुळे मी पूर्वपरीक्षेत अनुत्तीर्ण झालो! मला प्रचंड दु:ख झाले. आपले स्वप्न स्वप्नच राहील की काय? अशी भीती वाटू लागली. पूर्वपरीक्षेचा निकाल लागला तेव्हा आम्ही कोलकात्यात होतो. मी एकटाच व्हिक्टोरिया मेमोरियलला जाऊन स्वतःचे सांत्वन करत बसलो होतो. आपले काय चुकले याचे गणित मांडत होतो. मला कळून चुकले, की आपण परीक्षेसाठी पाहिजे तेवढा अभ्यास केलेला नाही. परीक्षेचा बारकाव्याने अभ्यास केलेला नव्हता, कोणत्या विषयाला किती महत्त्व व वेळ द्यायची गरज आहे याचे नियोजन केलेले नव्हते. फक्त आय.ए.एस. व्हायची इच्छा मनात बाळगल्याने मी परीक्षा पास होणार नव्हतो, तर त्यासाठी सूत्रबद्ध प्रयत्नांची आवश्यकता होती.
संघ लोकसेवा परीक्षेचा अभ्यास करणार्‍यांच्या दृष्टीने पूर्वपरीक्षा ही खूप महत्त्वाची पायरी असते. स्पर्धात्मकता, बहुपर्यायी प्रश्न असल्यामुळे आणि प्रत्येक वर्षी प्रश्नांचे काठिण्य वाढत असल्यामुळे ती परीक्षा पास होणे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे. परीक्षेत इतिहास, अर्थशास्त्रापासून दैनंदिन विज्ञानापर्यंतचा अभ्यास अपेक्षित असतो. मर्यादित वेळ, प्रश्नांचा अवाढव्य आवाका यामुळे परीक्षेत चांगल्या चांगल्यांची भंबेरी उडते. म्हणून बरेच परीक्षार्थी पूर्वपरीक्षेतच तीन-चार वर्षे अडकलेले असतात. शिवाय, लाखोने मुले बसत असल्यामुळे एक-दोन प्रश्न इकडे तिकडे झाले तरी अनुत्तीर्ण होण्याचा संभव असतो. एकेका मार्कावर शंभराने विद्यार्थी गळत जातात. म्हणजे मेरिट एका मार्काने कमी झाले किंवा वाढले तर त्यामुळे असंख्य परीक्षार्थींच्या भवितव्यावर परिणाम होतो.

माझा आत्मविश्वास त्यावेळी डळमळीत झाला. मनात अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले. आपल्यामध्ये खरेच एवढी क्षमता आहे का? आपण पुन्हा परीक्षा पास होऊ का? असे प्रश्न मनात येऊन दोन-तीन दिवस मला झोप आली नाही. मनास वेगळाच धसका बसलेला होता. माझ्या आजुबाजूच्या मंडळींना, माझ्या सहकार्‍यांना माझ्या मनस्थितीविषयी काही देणेघेणे नव्हते. ते मिश्किलपणे बोलत व मला परीक्षेचा नाद सोडून देण्याविषयी सल्ला देत. त्यातले बरेच परीक्षेला अयशस्वी झालेले होते. त्यामुळे ते मला सहानुभूती दाखवून परीक्षा किती कठीण आहे व पास होण्यात भाग्याचा वाटा किती आहे ते सांगत. माझ्या वरिष्ठांमध्येही परीक्षेचा तिटकारा असल्यामुळे त्यांच्याकडून प्रोत्साहनाची अपेक्षा करणे निरर्थक होते. एकंदरीत, कोणत्याही बाजूने माझा आत्मविश्वास वाढेल, लढायची शक्ती येईल असे वातावरण माझ्या आजुबाजूला नव्हते. मी अभ्यास करताना बघून बरेच सहकारी माझी खिल्ली उडवत. किती प्रयत्न झाले व किती राहिले याविषयी उपहासाने चौकशी करत. सर्व बाजूंनी परिस्थिती मला भारतीय सांख्यिकी सेवेत स्थिरावण्यासाठी उद्युक्त करत असल्याची जाणीव तीव्र होत असे. मात्र माझ्यामधील अस्वस्थता व धगधगता निखारा हे मान्य करायला तयार नव्हता. आपले हे शेवटचे स्टेशन नाही याची जाणीव मला प्रत्येक क्षणाला होत असे. दिवसागणिक मी काय करायचे, कसे करायचे याचाच विचार करत होतो.

------------------------------------------------------------------------------------

'ताई, मी कलेक्टर व्हयनू!'

लेखक - श्री. राजेश पाटील
प्रकाशक - ग्रंथाली
पृष्ठसंख्या - १५४
किंमत - रुपये १५०

------------------------------------------------------------------------------------

पुस्तकातील निवडक भाग ग्रंथाली, मुंबई, यांच्या सौजन्याने
टंकलेखन सहाय्य - संकल्प द्रविड, अंशुमान सोवनी

------------------------------------------------------------------------------------

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरदस्त! वाचायची उत्सुकता प्रचंड आहे. आणतो आता.

धन्यवाद पुन्हा एकदा चिन्मय (आणि संकल्प, अंशुमान) !

चिनूक्स, परत एकदा अजुन एका वेगळ्या पुस्तकाची ओळख करुन दिल्याबद्दल अनेक धन्यवाद!!
<<
थंडीच्या दिवसांत सकाळी उठणे जीवावर येई. स्वेटर नाव्हाचा प्रकार माहीत नसल्याने व विनाचप्पल हिंडावे लागत असल्याने त्यां दिवसांत खूप त्रास होई. ओरडताना फाटलेल्या ओठांतून रक्त निघे. गारठलेले हात पावाचा गारगार डबा धरायला नको म्हणत. भुरूभुरू वाहणारा थंड वारा सकाळी अंगाला झोंबे. छोटे छोटे दगड पायाला टोचत व भेगाटलेल्या पायातून कधीकधी रक्त निघे. बर्‍याचदा उठताना अंगाला काटे येत!
>>
हे वाचुन डोळ्यात पाणी आलं...

कधी एकदा देशात जाते आणी ही सगळी पुस्तकं आणतिये असं झालयं..

अरे वा! मला हे पुस्तक अधिवेशनात ग्रन्थालीच्या स्टॉलवर मिळाले. त्यांनी सांगितले चान्गले आहे म्हणून मी घेतले, बरे झाले. त्यामुळे आता 'काही पाने' वाचत नाही. सगळे पुस्तकच वाचेन. Happy
धन्यवाद चिनूक्स, फ, आर्फी.

सहीच... चिनूक्सा,अजुन एका चांगल्या पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद रे तुला..

चिनुक्स, धन्यवाद! चांगले वाटते आहे पुस्तक. पेपरमधील लोकसेवा आयोगाच्या परिक्षांचे जाहिरांतीचे नेहमी कुतुहल वाटायचे.

वा ! अजून एका चांगल्या आणि वेगळ्या पुस्तकाबद्दल वाचायला मिळाले. पुण्याला असताना घराजवळच्या झोपडपट्टीत अशी अनेक मुलं बघितली जी वाईट संगतीने बिघडतात आणि नंतर पुन्हा योग्य मार्ग सापडल्यावर चांगली प्रगती करतात.
हे पुस्तक मिळवायलाच हवं आता.

चिनूक्स धन्यवाद! अजून एका चांगल्या पुस्तकाशी ओळख करून दिलीस..

छान!

युपीएससी मध्ये निवड झालेला एक एक नग म्हंजे एक चित्तर कथा च असतो....!!!

अशा अनेक कथा स्टील फ्रेम ह्या मराठी पुस्तकात देखील आहेत.

सर्वसामान्य डब्यात प्रवास करायला आवडत असे, कारण तेथेच खर्‍या भारताचे दर्शन होते
१०० % सत्य आहे .

व्वा मस्त.....
खरच अभिमान वाट्तो अशा लोकाचा.......

धन्यवाद चिनूक्स!
आणी
जर कुणाला माहीती असेल तर सांगाल का ?
पुण्यात कुठे मिळेल ते?

--
धन्यवाद,
kadamcd@gmail.com

हे राहिले होते वाचायचे. Happy
आज उघडले, अन मंतरल्यागत वाचून गेलो.. सही.. Happy

---
हस्सरा नाचरा, जरास्सा लाजरा, सुंदर साजिरा, श्रावण आला..!

अगदी वेगळंच पुस्तक. जेवढं इथे वाचलं त्यावरून आता लालू कडे क्लेम लावलाच पाहिजे पूर्ण वाचायला. अधल्या मधल्या सेटबॅकबद्दल सुद्धा मोकळेपणाने लिहिलंय ते फार छान वाटलं वाचायला.

अशी एकसे एक सुरेख पुस्तक निवडून आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे अगदी मनापासून आभार!

खुपच छान...!
खुप वर्षापुर्वी वाचलेल्या 'झोंबी' या पुस्तकाची आठवण झाली.
धन्यवाद चिनूक्स..

मी पण जळगांवचाच अहीराणी वाला तुमच्या मुळे चांगल्या पुस्तकाशी नव्हेच तर जळ्गावी अहीराणी आयएएस अधिकारी आहे हेही वाचुन आनंद झाला धन्यवाद

मस्त खूप छान, याच लोकाच एक परिपूर्ण व्यक्तिमत्व असत.
अश्या लोकान मुळेच जगण्याची बहुदा कसे जगावे याची माहिती मिळते.
एक साधारण पाववाला मुलगा इतके विलशान कार्य करू शकतो,
जुगारी,चोरटा,लबाड मुलगा आज तो इतकी प्रगती करतो.
खरेच खूप बरे वाटले वाचून.
आयुष्य आपल्याला भरभरून देत असते,ते कसे संभाळायाचे आणि
त्याचा कसा वापर करायचा यालाच जीवन ऐसे नाव...