Court, State Vs a Nobody

Submitted by हरिभरि on 22 April, 2025 - 01:06

खूप दिवस झाले काही तरी लिहून. तस लिहाव सांगाव अस खूप काही साचलेलं असूनही लिहायला निवांत असा वेळ मिळत न्हावता. पण आज मी एक असा चित्रपट पहिला की सगळी कामे बाजूला ठेऊन मला त्याच्या बद्दल लिहावच लागल.

Netflix च्या कृपेने वेगवेगळ्या भाषेतले अनेक उत्कृष्ट चित्रपट अगदी रिमोटच्या एका बटणावर आले आणि अलीबाबाची गुहाच जणू खुली झाली.
इतके दिवस TRP च्या so called calculation मध्येच बसणारे चित्रपट TV वर लागायचे. त्यात “south” चे पिक्चर अत्यंत सुमार दर्जाचे, अतिरंजित, आणि कणा नसलेले बायकी नायक असलेले. नायक नायिकेच्या भोवती त्यांच्याच बरोबरीने वेडेचाळे करणारे सहकलाकार. दोन चार चित्रपट बघून हे मत मी बनवून घेतलं होत. त्यामुळे थोडी भाषा वेगळी ऐकली की लगेच चॅनेल बदलायचे.(हल्ली हे मत मराठी films ना लागू होतय).

असो… नमनाला घडाभर तेल वाहून झालय त्यामुळे मूळ विषयाकडे वळते. Court, state vs a nobody अस या तेलगू चित्रपटाचं नाव. नावावरून हा courtroom drama असेल हे कळत. आणि आहेच तो तसा. एक १७ वर्षाची नुकतीच वयात येणारी तरुणी, जाबिली आणि आत्ता आत्ताच मोठं झाल्याची फीलिंग आलेला नुकतच मिसरूड फुटलेला एक १९ वर्षाचा तरुण, चंदू. दोघांमध्ये एक खट्याळ निरागस प्रेम फुलतय.
इतर प्रेमकहाणी मध्ये असते तशी सामाजिक आर्थिक दरी या ही जोडीच्या नशिबी. पण हे गुलाबी वयच अस की.. गुंतता हृदय हे… प्रेमाशिवाय बाकी कसलाही व्यावहारिक विषय आसपासही फिरकत नाही. तिचं याच्या घरी येणं जाणं त्याच्या वडिलाना सोडून सर्वांना माहीत. तिच्या घरी मात्र कोणालाही याची खबर नाही.

जाबिलीचे वडील वारलेले आणि घरात मोठं खंबीर पुरुष माणूस नसल्याने, घरावर वरचश्मा मिळालेला एक विकृत आणि अहंकारी जावई. घरातले सर्वजण अगदी दाबून असतात. स्त्रियांवर so called संस्कार करण्याचा स्वयंघोषित अधिकार असल्या सारखी वागणारी, चाबकाने भर चौकात फटके मारण्याची लायकी असणारी एक मनोवृति आहे तिचा हा प्रतिनिघी. (याने संपूर्ण चित्रपट संपेपर्यंत माझ्याकडून खूप शिव्या खाल्लेल्या आहेत).

तर एक दिवस चुकून याला आपल्या नायक नायिकेबद्दल कळत. आता माझ्या घराण्याच्या इज्जतीची जबाबदारी माझी आहे या थाटात तो चंदूच्या घरी धडकतो . नुसता येत नाही तर येताना सोबत जबिलीची आई, आजोबा आणि पोलिसना घेऊन येतो. पॉक्सो कायद्यानुसार एक full proof केस बनवून. अनेकना manage करून. आणि चंदूच्या दुर्दैवाने जबिली नेमकी तेव्हाच त्याच्या घरात आलेली असते.
पोलीस त्याला पकडून नेतात. watchman असलेल्या वडिलांचे police station मध्ये कोणीही काही ऐकत नाही आणि चंदू रिमांड मध्ये अडकतो. कोर्टात केस उभी राहते आणि हा हा म्हणता म्हणता चंदू पार गळ्यापर्यंत अडकतो. त्याला वाचवणारं कोणीही नाही. आशेचा एकही किरण दिसत नाहीये.

आता न्यायाधीश सोमवारी अंतिम निर्णय सुनावणार असतात, तो चंदूच्या विरुद्ध जाणार हे स्पष्ट दिसत असताना, आदल्या शुक्रवारी एक होतकरू वकील त्याचा पहिला ब्रेक थ्रू म्हणून ही केस घेतो. आणि… या पुढचा चित्रपट आवर्जून पाहण्या सारखा आहे.
प्रेक्षकांना पहिल्या frame पासून शेवटपर्यंत खिळवून ठेवण्यात यशस्वी झालाय हा चित्रपट. आणि शेवटी अंतर्मुख करतो. अनेक स्तरांवर विचार करायला भाग ही पाडतो. प्रामाणिकपणा, निरागसता आणि विकृती. एक समाज म्हणून खरच आपण प्रगल्भ होतोय? आपल्या मनात सतत जगणाऱ्या, दुसऱ्याना judge करणाऱ्या न्यायाधीशाची खरी गरज कोणाला आहे? हे असे अनेक प्रश्न उभे करून चित्रपट संपतो.

एकदातरी वेळ काढून बघण्या सारखा चित्रपट…. Court, state vs a nobody…

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मागच्या आठवड्यातच मी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहिला.

चित्रपट परिचय (तसेच चित्रपटही ) आवडला. Happy