साखळी

Submitted by शिल्पा गडमडे on 18 April, 2025 - 15:53

सखारामने सायकलवर टांग मारली आणि रोजच्यासारखाच तो पत्र वाटपाला निघाला.

मोशीसारख्या लाल मातीच्या गावात, जिथे शेती आणि छोट्या-मोठ्या व्यवसायांवर लोकांचे पोटपाणी चालत असे, सखाराम तिथला एकमेव पोस्टमन होता. साधा, कष्टाळू आणि प्रामाणिक. वय पंचावन्न च्या आसपास, उन्हाने रापलेला चेहरा पण डोळ्यात आनंदाची चमक असणारा, सगळ्यांचा विश्वासू सखाराम.

दररोज सकाळी रंग उडालेल्या भिंती आणि पत्र्याच्या छपराखाली असलेल्या शेजारच्या गावातील टपाल कार्यालयात तो हजर होत असे. तिथे टपालाचे सॅार्टींग करणे, वाटेत येणाऱ्या घरांच्या पत्त्यानुसार ते क्रमाने लावणे आणि ते बॅगेत भरून पत्र वाटपाला मार्गस्थ होणे, हा सखारामचा दिनक्रम. कोणाचे पोस्टकार्ड, कोणाचे रजिस्टर पत्र, तर कोणाची लग्नपत्रिका आणि कसल्या कसल्या नोटिसा असे सगळे त्याच्या बॅगेत असे.

मोशी गाव लहान असल्यामुळे संपूर्ण टपाल व्यवस्था सखारामच्या एकट्याच्या हाती होती. सकाळी पत्र वाटपासाठी बाहेर पडल्यावर संपूर्ण गावात पत्रवाटप करून तो संध्याकाळीच घरी परतत असे. गावच्या चढ-उताराच्या रस्त्याने सायकल दामटताना थकवा आला तर कोणाच्या तरी पडवीत दोन घटका विसावायचे. त्या घरातल्या माणसांची ख्यालीखुशाली विचारायची, दोन घोट पाणी पिऊन पुन्हा मार्गस्थ व्हायचे, हे त्याचं रुटीन. वाटपासाठी कमी पत्रं असली तर तो थोडावेळ गजाननाच्या चहाच्या टपरीवर थांबून चहा पीत असे. ऊन, पाऊस, थंडी, वारा यानुसार या दिनक्रमात थोडाफार बदल होत असे.

सखारामच्या वाढणाऱ्या वयासोबत त्याचा सायकल दामटण्याचा वेग जरा मंदावला होता. त्यात दोन वर्षांआधी त्याची बायको ताराबाई गेल्यानंतर त्याला घरी परतायची घाई उरली नव्हती. त्याचा एकुलता एक मुलगा रमेश अनेक वर्षांपासून मुंबईला नोकरीला होता. त्याचे लग्न होऊन त्याला एक मुलगी झाली होती. ताराबाईच्या निधनानंतर रमेश वारंवार सखारामला नोकरी सोडून कायमचे मुंबईला येण्यासाठी आग्रह करत होता. पण लाल मातीत जगलेल्या सखारामला इथले मोकळं आयुष्य, जोडलेली नाती सोडून मुंबईच्या गजबजलेल्या, बंदिस्त आयुष्यात जगण्याचा विचार करवत नव्हता.

आजही सखारामने सायकलवर टांग मारली आणि रोजच्या सारखाच तो पत्र वाटपाला निघाला.

पत्र वाटत वाटत तो आपल्या घराच्या परिसरात आला. पुढच्या पत्रांचा गठ्ठा त्याने बॅगेतून बाहेर काढला. तेव्हा एका पोस्ट कार्डवर त्याची नजर गेली, त्यावर त्याचेच नाव होते- सखाराम पाटील.

“माझ्यासाठी पत्र?”

रोज पत्रांच्या जगात वावरणाऱ्या सखारामला त्याच्यासाठी पत्र येण दुर्मिळ होते. . रमेश, सखारामचा मुलगा आठवड्यातून एकदा टपाल कार्यालयात त्याला फोन करत असे. त्यामुळे त्याने पाठवलेले पत्र असण्याची शक्यता कमीच होती. बाकीचे नातेवाईकही आसपासच्या गावात राहत असल्यामुळे त्याला फारशी पत्र येण्याचा प्रश्नच नव्हता.

सखारामने पोस्टकार्ड हातात घेतले आणि तो ते वाचू लागला.

“नमस्कार,
हे पत्र तुमचे नशीब बदलण्यासाठी तुमच्यापर्यंत आलेले आहे. याकडे दुर्लक्ष करू नका.
हे पत्र पुढील सात दिवसांत दहा लोकांना पाठवा म्हणजे तुमच्या आयुष्यात सुखशांती नांदेल.
ज्यांनी हे पत्र पुढे पाठवले, त्यांच्यावर देवकृपा झाली. एका व्यक्तीला लॉटरी लागली, दुसरा अनेक वर्ष चाललेली शेतीची कोर्ट केस जिंकला. काहींच्या घरी लग्नाच्या अनेक वर्षानंतर पाळणा हालला, तर काहींना नोकरीत बढती मिळाली.
परंतु, ज्यांनी या पत्राकडे दुर्लक्ष केले, हे पत्र पुढे पाठवले नाही त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. एकाचा व्यवसाय बुडाला, तर दुसऱ्या व्यक्तीच्या घरी मृत्यू आला.
तुम्ही हे पत्र पुढे पाठवले, तर तुमच्यावर कृपा होईल आणि तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. पण जर तुम्ही पत्र पुढे पाठवले नाही तर पुढील सात दिवसांत तुमच्या जीवनात अनिष्ट घटना घडू शकतात.
या पत्राकडे दुर्लक्ष करू नका.”

हे वाचून सखाराम थबकला. पण अगदी क्षणभरच!

अशा पत्रांवर त्याचा विश्वास नव्हता पण हे पत्र वाचून त्याला अस्वस्थ वाटू लागले, काहीतरी अनिष्ट घडेल याची भीती वाटू लागली. अजून बरीच पत्रं वाटायची राहिली होती, पण त्याच्या डोक्यात मात्र त्या पत्रातील मजकूर फिरत होता. तो लक्ष विचलित व्हावे म्हणून गजाननच्या चहाच्या टपरीवर गेला. एक गरम चहा घेतला आणि तिथे बसलेल्या लोकांच्या गप्पांमध्ये लक्ष गुंतवण्याचा प्रयत्न करू लागला. पण आज काही त्याचे लक्ष गप्पांमध्ये लागेना. शेवटी लवकर पत्र वाटप करून तो घरी पोहोचला.

संध्याकाळचा स्वयंपाक, जेवण आटोपून तो झोपायची तयारी करताना पुन्हा पत्रातला मजकूर त्याच्याभोवती फेर धरू लागल्या. “हा केवळ मूर्खपणा आहे. या पत्राकडे दुर्लक्ष केलेलं बरं!” म्हणत त्याने पत्र कपाटात टाकले आणि झोपी गेला.

सकाळी सखाराम उठला तेव्हा त्याला पत्राचा विसर पडला होता. नेहमीप्रमाणे तो सकाळी शेजारच्या गावातील टपाल कार्यालयात जाण्यासाठी निघाला. अर्धे अंतर पार करत असताना अचानक भटक्या कुत्र्यांची टोळी त्याच्या सायकलच्या दिशेने हल्लाबोल करायला आली. त्यांच्या तावडीतून सुटका करायला सखारामने सायकल भरधाव दामटली. पण पुढे जाताच त्याच्या सायकलची साखळी तुटली. गडबडीत तो तोल जाऊन खाली पडता पडता सावरला. त्याने मागे वळून पाहिले , तर कुत्र्यांचा मागमूसही नव्हता. त्याने सुटकेचा निश्वास टाकला, आजूबाजूला पाहिले तर दूरदूरवर सायकल दुरुस्तीचे दुकान नसल्यामुळे त्याला खूप अंतर चालत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. तो धपापत्या उराने सायकल घेऊन चालू लागला, तोच त्याला कालच्या पत्राची आठवण झाली.

“इतके वर्ष आपण या रस्त्याने जातो पण कधीच कुत्री आपल्या मागे लागली नाही की कधी सायकलची साखळी तुटली नाही. हा फक्त योगायोग आहे की यामागे त्या पत्राचा काही संबंध असावा?” सकाळपासून त्या पत्राच्या तावडीतून सुटलेले मन पुन्हा त्या पत्राच्या तावडीत गेलं.
“काय करावं? पत्रात लिहिल्याप्रमाणे दहा लोकांना पत्रं पाठवायची की दुर्लक्ष करून आपल्या रोजच्या दिनक्रमाला लागायचे? आपल्यासोबत, रमेशसोबत काही वाईट घडले तर? दहा पत्र पाठवल्याने असा काय फारसा फरक पडणार आहे कोणाला? पण, आपण जसे घाबरलो तसं पत्र मिळणाऱ्या व्यक्तीला घाबरवायला नको ना? ती व्यक्ती अजून दहा लोकांना पत्र पाठवेल, त्या दहातील अजून दहा लोकांना! ही साखळी अशीच पुढे जात राहील.” असे अनेक प्रश्न सखाराम भोवती फेर धरून नाचू लागले. त्याला ताराबाईची आठवण आली. ती असती तर कदाचित आपला एवढा गोंधळ उडाला नसता असे त्याला वाटून गेले.

ही पत्र साखळी तोडल्याने काही नुकसान होईल का नाही हे आजमावून पाहण्याची जोखीम घ्यायला सखाराम तयार नव्हता. रात्री बसून त्याने दहा पोस्टकार्ड लिहून काढली. ज्या लोकांच्या घरी उद्या पत्र पोहचवायची असतील त्यातील दहा लोकांच्या घरी हे नाव नसलेले एक एक पत्र टाकायचे. असे ठरवून तो झोपी गेला.

सकाळी टपाल कार्यालयातून टपाल घेऊन वाटायला निघताना, त्याच्या वाटेत पहिले घर लागले ते मनीषाचे. साधारण ३० – ३५ वर्षाची मनीषा मागच्या वर्षी विधवा झालेली. तिच्या पदरात दोन लहान मुलं होती. तिच्या नवऱ्याची पेन्शन तिला मिळावी म्हणून ती सरकारी दरबारात खेपा घालून थकली होती. त्या संदर्भात तिला बरीच पत्रं येत असत. आजही सखाराम कडे टपाल कार्यालयातून आलेले रजिस्टर्ड पत्र होते . सखारामने रजिस्टर्ड पत्र तिच्या हाती दिले. . त्या पत्राच्यासोबत दहा पोस्टकार्ड पैकी एक पोस्टकार्ड देखील त्यात सरकवले . मनीषाने रजिस्टर्ड पत्र पाहून, ते लगेच उघडले. पेन्शन मंजूर झाले असल्याचे ते पत्र होत. ते पत्र वाचून मनिषाच्या डोळ्यात पाणी तरळले. “माझ्या खडतर आयुष्यात या पत्राने थोडा दिलासा दिलाय.” मनीषा डोळे पुसत सखारामला म्हणाली, “या पत्राच्या रूपाने तुम्ही आनंद घेऊन आलात. तुमचे खूप आभार पोस्टमनकाका.”

मनिषाच्या चेहऱ्यावरचे समाधान बघताना सखारामची नजर तिच्या हातातल्या पोस्टकार्डकडे गेली. तो लगेच तिला म्हणाला, “पोरी, तुझ्या रजिस्टर्ड पत्रासोबत चुकून हे पोस्टकार्ड दिले गेले आहे ते तेवढे मला परत दे” तिच्याकडचे पोस्टकार्ड पटकन बॅगेत टाकून तो घाईने घराकडे निघाला. घराच्या मागच्या बाजूला जाऊन बॅगेतून दहा पोस्टकार्ड बाहेर काढली आणि जाळून टाकली.

पत्र जळताना त्या धूराने त्याचे डोळे भरून आले पण त्याचे मन आणि नजर पूर्णपणे स्वच्छ झाली होती. पत्राची आणि भीतीची साखळी तुटली होती.

@ शिल्पा गडमडे

महाराष्ट्र मंडळ सिंगापूरच्या २०२५ च्या वसंत ऋतूतील ऋतुगंधच्या ‘पत्र’ विशेषांकात पूर्वप्रकाशित

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults