निर्जीवांचा लळा

Submitted by ऋतुराज. on 31 March, 2025 - 10:40

निर्जीवांचा लळा

आपल्या आजूबाजूला असणाऱ्या अनेक ओळखीच्या माणसाप्रमाणे काही निर्जीव गोष्टींचीही आपल्याला सवय झालेली असते. म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या दैनंदिन रूटीन मध्ये आपल्याला त्याच गोष्टी हव्या असतात. उदाहरणार्थ, सकाळी उठल्यावर एका ठरलेल्या जागी बसूनच, ठरलेल्या कपातच चहा किंवा कॉफी पिणे, आपल्या ठरलेल्या ताट, वाटीत खाणे, आपल्याच पेला, तांब्यातून पाणी पिणे, झोपताना ठरलेली चादर वा उशी घेणे अश्या अनेक गोष्टी असतात.
बरेचदा त्या ठरलेल्या गोष्टी मिळाल्या नाहीत तर मग कसतरी होतं, चुकचुकल्यासारखं वाटत. असं का बरे होत असावं? खर तर हा नुसत्या सवयीचा भाग नसून बरेचदा त्या वस्तूंशी आपल्या किंवा आपल्या प्रेमाच्या व्यक्तीविषयीच्या भावना, आठवणी जोडलेल्या असतात. स्त्रियांच्या बाबतीत तर ते फार प्रकर्षाने जाणवत. आईच्या लग्नातली पितळी भांडी दर वर्षी मोडीला देऊ म्हटलं तर मोडवत नाही. बाबांचं आऊटडेटेड झालेलं घड्याळ अजून तसच पडून आहे , ते टाकवत नाही. घरात अगणित बॅगा आहेत पण आजोबांची जुनी सुटकेस (आणि त्यातलं बरच काही ) तसच पडून आहे. मिक्सर येऊन जमाना झालाय पण पाटा वरवंटा आणि, खलबत्ता अजून माळ्यावर पडून आहेच. काही जुन्या साड्या व कपडे बोहारणीच्या गाठोड्यातून परत हळूच कपाटात कोपऱ्यात जाऊन बसताहेत. काही जुने दागिने आता कशावरही मॅचिंग होऊ लागलेत. काही जुनं फर्निचर रंगरंगोटी करून परत दिमाखात वापरात आलय. खरंच अगदी चहापावडर, साखरेच्या डब्यातल्या त्या किल्व्हरच्या चमच्यांपासून ते नथ, एकदाणी, मोहनमाळ या दागिन्यांपर्यंतच्या असंख्य निर्जीव गोष्टीनी आपल्याला एक अनामिक लळा लावलेला असतो. तो सुटता सुटत नाही.
आता कदाचित आधुनिकीकरणाच्या जमान्यात ह्यातल्या काही गोष्टी कालांतराने नसतीलही, किंवा त्याची सवयही सुटेल परंतु त्यांची आठवण मात्र कायम राहील. आवडत्या उदबत्तीच्या सुगंधासारखी..... मंद.....
तुमची आहे का एखादी अशी वस्तू...आवडती?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाकी ते झाकण हरवले म्हणून डबा फेकून देऊया हे माझ्या आईला सांगायला गेलो तर तिला ते चार्जर हरवला म्हणून मोबाईल फेकून देण्यासारखे वाटेल>>>> अगदी
भांडी घासायची पावडर ठेऊनच त्याला या जन्मातून मुक्ती मिळते >>> Lol दोन्ही कॉमेण्ट भारी आहेत

बाकी ते झाकण हरवले म्हणून डबा फेकून देऊया हे माझ्या आईला सांगायला गेलो तर तिला ते चार्जर हरवला म्हणून मोबाईल फेकून देण्यासारखे वाटेल >> Lol

बाकी ते झाकण हरवले म्हणून डबा फेकून देऊया हे माझ्या आईला सांगायला गेलो तर तिला ते चार्जर हरवला म्हणून मोबाईल फेकून देण्यासारखे वाटेल>>> Lol

भांडी घासायची पावडर ठेऊनच त्याला या जन्मातून मुक्ती मिळते> +११११ Lol
चार्जर

ऋतूराज Lol

माझ्या कॉमेंटवर तुमची कॉमेंट वाचताना मूळ डब्बा डोक्यातून निसटून गेला आणि पटकन वाटले जुन्या मोबाईलचा वापर भांडी घासायची पावडर ठेवायला करतात की काय यांच्याकडे... पण ते ही क्षणभर पटले, म्हटले या आपल्या जमानाच्या आया काहीही करू शकतात Lol

ऋ आणि ऋ Lol डब्याच्या आणि फडक्यांच्या याबाबतीत सगळ्या आया सेम असतात .डबे आणि फडक्यांची नेहमी किचनमध्ये शेवटच्या स्तरावर निवृती व्हायची.अजूनही होते. प्रत्येक मध्यवर्गीय मराठी घरघरकी कहानी.
माझी आई तर मशीनवर शिवायची ,त्यामुळे तिला चिंध्या चटोऱ्या जमा करायची हौस होती.कशाला चिंधी चटोरी हवी आणि ती मिळाली नाही ,असं आमच्या घरात व्हायचं नाही . आमच्या घरी अनेक छोटी कॉटन च्या कापडाची छोटी बोचकी पलंगात कायम असत ,जी गोधडी किंवा पुसायला कामी येतील म्हणून आई ठेवायची. तीच सवय मला लागलीय असं भाऊ म्हणतो तो मात्र वेगळा आहे तो स्वतःचे नविनसारखे असणारे एकदा घातलेले कपडेही माणुसकीच्या भिंतीवर लावून येतो.आमच्या घरातला दानशूर कर्ण.

पण ते ही क्षणभर पटले, म्हटले या आपल्या जमानाच्या आया काहीही करू शकतात>>>>> ऋन्मेSSष... Don't underestimate power of माँ. Lol
त्या काहीही करु शकतात.
नाहीतर दिवाळीत आणि नंतर वापरून झालेल्या पणत्या तवा घासायला वापरून त्यांना पंचत्वात विलीन करण्याची ताकद बाकी कोणातच नाही.....

माझी आई तर मशीनवर शिवायची ,त्यामुळे तिला चिंध्या चटोऱ्या जमा करायची हौस होती.कशाला चिंधी चटोरी हवी आणि ती मिळाली नाही ,असं आमच्या घरात व्हायचं नाही . आमच्या घरी अनेक छोटी कॉटन च्या कापडाची छोटी बोचकी पलंगात कायम असत ,जी गोधडी किंवा पुसायला कामी येतील म्हणून आई ठेवायची. तीच सवय मला लागलीय असं भाऊ म्हणतो तो मात्र वेगळा आहे तो स्वतःचे नविनसारखे असणारे एकदा घातलेले कपडेही माणुसकीच्या भिंतीवर लावून येतो.आमच्या घरातला दानशूर कर्ण.>>>>>
सिमरन,
हे वाचून अगदी अगदी झाले.
माझ्याच घरातील वर्णन
माझा भाऊ सुद्धा आहे आमच्या घरातील दानशूर कर्ण

माझ्या बहिणींना ह्या धाग्याची लिंक पाठवली तर आवडलं तिला >> तुम्ही घरच्यांना माबोच्या लिंका पाठवता आणि ते त्या वाचतात!!! #वेगळंजग

हर्पा Happy
मीही काहीबाही मला आवडलेले पाठवते मैत्रिणींना, त्याही वाचतात. भावाला एकदा माझ्याच फिलॉसॉफिकल लेखाची लिंक पाठवून नंतर त्यात काय लिहिलेय हे सांगू लागले तर तो 'तू तर अगदी माझ्या सलूनवाल्यासारखंच बोलतेयस' Lol म्हणाला. मग मी 'पाठवते का बघ तुला आता लिंक' म्हटले. तो काहीही वाचत नाही मी लिहिलेलं, एक अक्षरही नाही. 'वेगळीच बाई वाटते ही कुणीतरी' म्हणतो.

Don't underestimate power of माँ >>> Lol

तू तर अगदी माझ्या सलूनवाल्यासारखंच बोलतेयस >>> Lol

#वेगळंजग +1 आमच्याकडे काडीचाही इंटरेस्ट नसतो माबो वाचायचा.मीच माबोचं नाव घेता माहिती पुरवत असते.

सलूनवाल्यासारखं Lol

तू तर अगदी माझ्या सलूनवाल्यासारखंच बोलतेयस >>> आश्रम ते सलून - काय रेंज आहे! Lol

तू तर अगदी माझ्या सलूनवाल्यासारखंच बोलतेयस >> Lol

वेगळीच बाई वाटते >> Lol

तर अगदी माझ्या सलूनवाल्यासारखंच बोलतेयस >>> आश्रम ते सलून - काय रेंज आहे!>>>> Lol मला पण घरचे माबोवरून चिडवतात , आलं हिचं माबो म्हणतात. पण चांगलं चांगलं वाचायला आवडतं ना.

लळा ही गोष्ट ....आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कार्ट... टाईप आहे. दुसऱ्यांच्या आवडीच्या गोष्टी बाबत खूप तटस्थ आणि रॅशनल विचार करणारे स्वतःच्या गोष्टीसाठी मात्र हळवे असतो. मी ऋतुराज यांच्या चिनी मातीच्या धाग्यावर आमच्या घरातले गेल्या १०० वर्षातले सिरॅमिक कलेक्शन share करतीये त्यातला एकही पीस मी टवका उडाला, crack झाला म्हणून टाकला नाहीये. असाच अजस्त्र पसारा भांड्यांचा होता. आजे सासूबाई, सासूबाई आणि मी स्वतः आमचे तांब्या, पितळे ची, स्टीलची, अल्युमिनियम, हिंडलियम, काचेची, चिनी मातीची, non stick, colour coated, bidachi असंख्य भांडी घरात होती. एक दिवस मी अतिशय निर्दयपणे तो पसारा काढला, घरात काम करणाऱ्या शेतात काम करणाऱ्या लोकांना जास्तीची भांडी सरळ वाटून टाकली. तांब्या पितळेच्या मोडीत द्यायची म्हणून बाजूला ठेवली... सासूबाईंनी त्यातल्या त्यात वेळ वाढवायला अगं आपण ती मोड मुंबईला देऊ म्हणून सुचवले त्यावर जाण्या येण्यात पेट्रोल खर्च होईल इथेच देऊन टाकू म्हणून देऊन टाकली.... आता वाटतं उगीच असा दुष्टपणा केला आपण. एवढ्या मोठ्या घरात राहिली असती भांडी कोपऱ्यात पडून तर काय बिघडले असत... सासूबाईं समजूतदार होत्या, काही बोलल्या नाहीत, आणि मी झाशीच्या राणीच्या थाटात एक किल्ला सर झाला, पसारा गेला असा विचार केला. त्यांच्या काळात त्यांनी घेतलेल्या गोष्टींचा त्यांनाही लळा असेलच की.... I failed to understand it.

आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कार्ट...>>>> हे अगदी खरं आहे माझीही कित्येक वर्षांपासून जपून ठेवलेली पेपरची कात्रण ज्यात लेख, रेसिपीज आणि चित्र होती. ती घरच्यांना कचरा वाटायची, शेवटी यातलं थोडाफार सॉर्ट करून ठेव आणि बाकीच सगळं जाऊदे म्हणून सांगितल्यावर, एका दिवाळीला ते बाकीचं रद्दीत देऊन टाकलं, तेव्हा वाईट वाटलं पण नंतर त्यांची बाजू पटली .आपल्याला महत्वाचं वाटत ते दुसऱ्याला महत्वाचं वाटेल असं नाही. जागेचा प्रश्न आणि मॅनेज करणं ही देखील एखाद्यासाठी कठीण गोष्ट असू शकते.

@गंधकुटी ,तुम्ही वाईट वाटून घेऊ नका .तुम्ही तर इतक्या सुंदर 100 पेक्षा जास्त वर्षांपूर्वी च्या वस्तूंचा ठेवा सांभाळून ठेवला आहे तोही अगदी निगुतीने ,तेही कौतुकास्पद आहे. उलट इतक्या गोष्टी सांभाळून ठेवण, जपणं हा व्याप खरच खूप मोठा आहे.

आता हे भोग आलिया
भोगुनी ते सरती
<<<<<
हे आलियाला का सांगायचंय पण? Proud तिला कळेल का एवढं मराठी?

@ गंधकुटी,
मी अगदी तुम्हाला काय वाटतंय ते समजू शकतो.
पण या बाबतीत कळतं पण वळत नाही असा प्रसंग असतो.
अशा लळ्याचा पुढे त्रास होतो. पण ही आसक्ती सोडणे अवघड आहे. कालांतराने जमेल असे वाटते.
असे सध्या म्हणतोय. बघू.
पुस्तकांच्या बाबतीत तरी आता हळूहळू सहा महिन्यांनी QC करून काही पुस्तके कमी करतो.

माझी आई तिच्या माहेरच्या तांब्या पितळेच्या भांड्यांची आठवण काढून हळहळायची. ही सगळी भावंडे मुंबईला आली. काही भांडी तिथल्याच चुलत घरच्यांनी घेतली. मामांनी काही आणली, पण ती वापरणं किंवा नांदवणं कठीण झाल्यावर विकली.
आमच्याकडेही तांब्या - पितळेचे काही डबे , टोप आणि कळश्या होत्या. आईने पुढे ही भांडी काढू दिली. डबे सोडले तर ती वापरात नव्हतीच.

मला वस्तूंचा लळा आहे असं वाटत नाही. आमच्याकडे प्रत्येकाचं ताट, ग्लास, पेला, चहाचा कप इ. ठरलेली आहेत. पण तो सवयीचा भाग आहे.

भांड्यांना आणि वस्तूंना आठवणी चिकटणं मात्र आईच्या गुणसूत्रांतून माझ्याकडे आलं. कोणती वस्तू कधीपासून आहे, कोणी दिली किंवा कधी, कुठे घेतली हे उगाचंच आठवत राहतं.

वापरात नसलेल्या वस्तू टाकल्या जात नाहीत, याचं कारण आळस आहे किंवा या पुढे कधीतरी रिसायकल करू असा भ्रम.

तू तर अगदी माझ्या सलूनवाल्यासारखंच बोलतेयस >> Biggrin

वेगळीच बाई वाटते >> Lol

मी तर वस्तू टाकून देते याची सासरी जरा धास्तीच आहे. म्हणजे डिक्लटरिंग करताना मला त्रास नाही होत. नवरा आणि साबा काय वाट्टेल ते जपून ठेवतात. मनातल्या अढीपासून कपड्याच्या घडीपर्यंत काहीही जपतात. Uhoh
मी आणि सासरे हे या दोघांच्या मते "घे की फेक!" क्याटेग्रीतले. त्यांचा मला बराच सपोर्ट असतो. ("उचल आणि दे टाकून. काही कुणाला सांगू नको! दिसलं नाही की विचारतील तेव्हा बघू" असं ते म्हणतात पण इतकं टोक गाठत नाही मी)

मला वाटतं की जे जुनं आणि वापरण्यापलिकडे गेलंय किंवा माळ्यावरच पडून वापरात नाहिये त्यात काय अडकयचं! २२ वर्षांपूर्वीचे मावशीने घेतलेले कपडे आता आपण (फिटिंगला येत असूनही) घालत नाही तर कपाटात अडगळ नको असा माझा विचार. म्हणजे एखादा आपला ठेवायचा फार आठ्वण वाटली तर... पण पसारा कशाला!. पण हा विचार पटत नाही. कधीच्या काळी कुणीतरी काहीतरी दिलेलं त्या क्षणापासून माळ्यावर आहे पण ते टाकायचं नाही. जुने पडदे मला पायपुसण्याला हवे तर ते घड्या करून बैठक म्हणून घ्यायची हौस... मी चांगल्या बैठका आणते म्हटलं तर नाही. भलतीकडे काटकसर! पायपुसण्याला दुसरा कपडा घे म्हणे! आता पायपुस्णं नेहमीच घाणच असलंच पाहिजेच का? Lol पुनर्वापर मीही करते, पण कुठल्या वस्तूचा आणि कशा प्रकारे यावर मतैक्यच होत नाही. मग अडगळ वाढते फक्त!

*परंतु त्यांची आठवण मात्र कायम राहील. आवडत्या उदबत्तीच्या सुगंधासारखी..... मंद.....* - प्रस्तावनेतील यावरून मुद्दा वस्तू ठेवण्याचा वा फेकून देण्याचा नसून, त्याची आठवण कायम येत राहील असा लळा लागण्याचा असावा, असं मला वाटतं .

काही भांडी तिथल्याच चुलत घरच्यांनी घेतली.>>>आमच्यापण
हे गावाकडील चुलत्यांचे व्यवच्छेदक लक्षण मानायला पाहिजे.

"घे की फेक!">>>> सगळ्यांच्या घरात असा एकतरी जण असतोच.

मुद्दा वस्तू ठेवण्याचा वा फेकून देण्याचा नसून, त्याची आठवण कायम येत राहील असा लळा लागण्याचा असावा>>>> बरोबर.
अर्थात ही आसक्ती नंतर अडगळ, मनस्ताप होऊ शकते. पण त्या आठवणी सुखद असतात.

Pages