निर्जीवांचा लळा

Submitted by ऋतुराज. on 31 March, 2025 - 10:40

निर्जीवांचा लळा

आपल्या आजूबाजूला असणाऱ्या अनेक ओळखीच्या माणसाप्रमाणे काही निर्जीव गोष्टींचीही आपल्याला सवय झालेली असते. म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या दैनंदिन रूटीन मध्ये आपल्याला त्याच गोष्टी हव्या असतात. उदाहरणार्थ, सकाळी उठल्यावर एका ठरलेल्या जागी बसूनच, ठरलेल्या कपातच चहा किंवा कॉफी पिणे, आपल्या ठरलेल्या ताट, वाटीत खाणे, आपल्याच पेला, तांब्यातून पाणी पिणे, झोपताना ठरलेली चादर वा उशी घेणे अश्या अनेक गोष्टी असतात.
बरेचदा त्या ठरलेल्या गोष्टी मिळाल्या नाहीत तर मग कसतरी होतं, चुकचुकल्यासारखं वाटत. असं का बरे होत असावं? खर तर हा नुसत्या सवयीचा भाग नसून बरेचदा त्या वस्तूंशी आपल्या किंवा आपल्या प्रेमाच्या व्यक्तीविषयीच्या भावना, आठवणी जोडलेल्या असतात. स्त्रियांच्या बाबतीत तर ते फार प्रकर्षाने जाणवत. आईच्या लग्नातली पितळी भांडी दर वर्षी मोडीला देऊ म्हटलं तर मोडवत नाही. बाबांचं आऊटडेटेड झालेलं घड्याळ अजून तसच पडून आहे , ते टाकवत नाही. घरात अगणित बॅगा आहेत पण आजोबांची जुनी सुटकेस (आणि त्यातलं बरच काही ) तसच पडून आहे. मिक्सर येऊन जमाना झालाय पण पाटा वरवंटा आणि, खलबत्ता अजून माळ्यावर पडून आहेच. काही जुन्या साड्या व कपडे बोहारणीच्या गाठोड्यातून परत हळूच कपाटात कोपऱ्यात जाऊन बसताहेत. काही जुने दागिने आता कशावरही मॅचिंग होऊ लागलेत. काही जुनं फर्निचर रंगरंगोटी करून परत दिमाखात वापरात आलय. खरंच अगदी चहापावडर, साखरेच्या डब्यातल्या त्या किल्व्हरच्या चमच्यांपासून ते नथ, एकदाणी, मोहनमाळ या दागिन्यांपर्यंतच्या असंख्य निर्जीव गोष्टीनी आपल्याला एक अनामिक लळा लावलेला असतो. तो सुटता सुटत नाही.
आता कदाचित आधुनिकीकरणाच्या जमान्यात ह्यातल्या काही गोष्टी कालांतराने नसतीलही, किंवा त्याची सवयही सुटेल परंतु त्यांची आठवण मात्र कायम राहील. आवडत्या उदबत्तीच्या सुगंधासारखी..... मंद.....
तुमची आहे का एखादी अशी वस्तू...आवडती?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निर्जीवांचा लळा सजीवांपेक्षाही जास्त लागतो असे वाटते Happy
बऱ्याच वस्तू आहेत : चष्म्याची फ्रेम, पैशांचे पाकीट, फिलिप्स ट्रांजिस्टर वगैरे वगैरे . . .

जोपर्यंत निकामी होत नाही तोपर्यंत वापरतच राहणार !

एक फेज होती वस्तूंशी, रूटीनशी असं सख्य वाटायची. मग आयुष्याच्या शाळेने इतके मजेमजेचे धडे शिकवले की तसलं काही उरलं नाही. आत्ता या घडीला जे पत्ते हातात आहेत ते वापरून सुरू असेल तो डाव खेळायचा असं काहीसं वळण लागलं आहे एव्हाना. यात चांगलंवाईट असं सांगता येणार नाही मला. त्या असोशीतही एक गंमत होती आणि या निर्लेपपणातही एक प्रकारचं समाधान आहे.
आताही अगदी तुटेमोडेपर्यंत बदलत नाही वस्तू - पण ते सख्य म्हणून नव्हे, तर स्वभावात ममवपणा बाणलेला असल्यामुळे.

मलाही पूर्वी लळा असावा. आता इतक्या जागा बदलल्याने असेल, काही साठवून ठेवायचं नाही हे वळण लागलं आहे. म्हणजे लळा लागेल इतकं तरी नक्की नाही. ज्याचा वापर नाही, त्यातली एखाद दुसरी गोष्ट आठवण म्हणून ठेवली तर बाकी डिक्लटर जमेल तितकं करतो. एका दमात अर्थात होत नाही, पण परत परत करत कमी होतं. नाही झालं तर लळ्याने नाही तर अंगीभूत आळसाने साठवलेलं रहातं. Happy
बाकी चहाचा कप, पेला, तांब्या आणि पांघरुण स्वच्छ असलं की झालं गत आहे.
तुझ्या लिंका/ संदर्भ कसे साठवता धाग्यावर म्हणूनच प्रतिसाद दिला न्हवता, कारण माहिती साठवतच नाही. बुकमार्क करतो फारतर. पण गूगल करुन माहिती सापडली तर आपली. नाही सापडली तर गेली प्रवाहात. नाही संदर्भ सापडला तर आणखी शोधायचा, तरी नाहीच सापडला तर कुठे काय बिघडतंय असं वाटतं.
वरच्या लिस्ट मधली एकही वस्तू माझी वाटावी असं रिलेट झालंच नाही. एक कप फुटला की दुसरा, तो धुतलेला नसला की तिसरा, कॉफी संपली की चहा, तो करायला वेळ नसला तर नेसकॉफी, ती ही नसेल तर टी बॅग गरम करुन, ते ही नसेल तर... इतकं होत नाही कधी पण .. आता बाहेर पडलं की आणलं पाहिजे असा विचार.
आता विचार करतो असं काही सिग्नेचर 'माझं' काही आहे तरी का! Happy
>>अगदी तुटेमोडेपर्यंत बदलत नाही वस्तू - पण ते सख्य म्हणून नव्हे, तर स्वभावात ममवपणा बाणलेला असल्यामुळे. >> याला ही +१. हे दुसर्‍याने केलं नाही तर मनावर न घेणे हे मात्र अजुन शिकता आलेलं नाही.

जोपर्यंत निकामी होत नाही तोपर्यंत वापरतच राहणार !>> मीपण ह्या कॅटॅगीरितली. मला वाटत मध्यम वर्गात वाढले आणि इथे हातात सात डॉलर्स घेऊन आले. आणि पुण्याची. Happy

खूप छान विषय.. यावर तर मी स्वतंत्र लेख लिहून प्रकाशित करू शकतो.
माझा फार जीव अडकतो पर्सनल गोष्टीत.
कदाचित स्वतःवर प्रचंड प्रेम करत असल्याचा फॅक्टर इथेही काम करत असावा.
आवडीची चप्पल मी सोल निघेपर्यंत वापरतो, आवडीचे कपडे पार फाटेपर्यंत वापरतो, त्याची रया गेली तर बाहेर न वापरता घरी वापरतो, पण वापरतो, ते केवळ कम्फर्ट म्हणून नाही तर त्यांनी मला एक आयडेंटिटी दिली असते असे काहीसे वाटते आणि त्यांच्याशी एक नाते तयार होते. असा आवडीचा कपडा विरून जेव्हा त्याला पहिले भोक पडलेले दिसते तेव्हा आता हा काहीच दिवसांचा सोबती या विचाराने डोळ्यात पाणी यावे इतका त्रास होतो.

चहाचा कप माझा ठरलेला असतो, कित्येकांचा तो असावा पण माझा जीव अडकतो. चार सहा महिन्यापूर्वीची गोष्ट. माहेरी म्हणजे मुंबईच्या घरी गेलो असताना आईला साफसफाईत माझा चहाचा कप सापडला. इतके भरून आले. माझे नवीन लग्न झाले होते, आयुष्याचे गोल्डन डेज, वीकेंडला नव्या बायकोसोबत नाईट मारायची, मूवी बघायचे, स्नॅक्स पार्टी करायची तेव्हा दोघांनाही कॉफीची फार आवड म्हणून तेव्हा घेतलेला तो कॉफी मग होता. घर बदलले त्यात तो कुठेतरी गहाळ झालेला तो आता सापडला. कळकट मळकट झालेला. आईला म्हटले मला यात चहा हवे तसे तिने खचखचून धुतले आणि तो उजळला.
आता घरी गेले की त्यातच चहा पितो Happy

अश्या वस्तू आणि किश्यांची फार मोठी लिस्ट आहे पण आता झोप आली आहे तर शुभ रात्री Happy

मला पण अनेक गोष्टींचा लळा आहे पण attachment नाही.
एखादी आवडती गोष्ट निकामी झाली, वापर होणार नाही, रिसायकल करता येणार नाही, असे वाटले तर लगेच स्क्रॅप करतो. उगीच वर्षानुवर्षे संभाळत नाही. याला अपवाद फक्त घरातली पुस्तके असतील.
वापरताना प्रत्येक गोष्ट अगदी ती निकामी होईपर्यंत वापरतो. कोणतीच गोष्ट जुनी झाली म्हणून बदलत नाही.

सध्याच्या आवडत्या/ लळा असलेल्या गोष्टींमध्ये माझ्याकडे असलेल्या knives, कॅाफी चे मापाचे चमचे, माझे पाकीट, आमची कार, माझी अनेक पायताणे, बॅडमिंटन रॅकेट, या पटकन आठवल्या.

मला तर ज्या जागी आपल्या जीवलग मित्रपरिवाराबरोबर गेलो असतो त्या देखील पझेसिव्ह बनवतात. माझे कपडे सरासरी १५ वर्षे जुने आहेत आणि त्यांचा स्पर्श अगदी हवाहवासा वाटतो. बाहेर गावी जाताना माझी दुलई वजा दुपटे मी बरोबर नेतो. जुन्या डायर्या मनाला शेकडो मैल दूर ङेऊन जातात. इतके की माझ्या जुन्या भाड्याच्या घरी वाशिमला मध्यंतरी गेलो होतो तेव्हा तिथल्या शहाबादी फरश्याना सुध्दा कुठे तडे गेले होते ते मला आठवायचे.
अन मला हे स्वप्नरंजन आवडते आणि त्या वस्तू सुध्दा कारण त्यांच्या भोवती मोहक क्षण गुंतलेले असतात, आयुष्या ची मालिका गुंफलेली असते. त्या निर्जीव नसतात...
जुने जॅकेट मला मनालीला घेऊन जाते तर जुने पेन मला माझ्या कोरि या आणि जपानी मित्रांच्या घरी नेते....

“वस्तूं”च्या बाबतीत हा जीव अगदीच कोरडा आहे. माझे निर्जीव वस्तूंमधे फार गुंतणे होत नाही, I just enjoy using things, without necessarily owning them. त्यात मात्र चोखंदळ आहे, चॉइस चांगला असल्याचे compliments अनेकदा मिळतात.

Fellow humans are my true treasure, तिथे गुंतवणूक आणि गुंता दोन्ही जरा जास्तच आहे 🙂

इथे लळा वाचुन दुपार पासून संदीपची ...
कारे इतका लळा लावुनी नंतर मग ही गाडी सुटते,
डोळ्यांदेखत सरकत जाते आठवणींचा ठिपका होते.
गाडी गेली, फलाटावरी निश्वासांचा कचरा झाला
गाडी गेली, डोळ्यांमधल्या निर्धाराचा पारा फुटला .. हेच दरवेळी आठवतंय! Happy

अतरंगी कॉफीच्या चमच्यांवरुन.. मला कॉफीचे डब्ल्यु डी टी डिस्ट्रीब्युशन टूल्स, आणि अँगल्ड स्लोप्ड टँम्पर विकत घ्यायचा आहे. पण अजुन धीर एकवटलेला नाही. Lol सध्या एस्प्रेसो मशीन बरोबर आलेल्या चमच्याच्या मागचाच टँपर वापरतोय.

हेहेहेहे ऋतुराज माझ्या चमच्यावरुन हा विषय सापडला का? आता चमच्याचा फोटो टाकलाच पाहिजे. माझा जीव फाssssssssर अडकतो. नको इतका. मला त्रास होतो त्याचा. मला बदलायचं आहे.
आता हा चमचा, मी २ री ३ री तर असल्या पासून ( किंवा माझ्या जन्माआधीपासून) आमच्या घरी आहे. राक्षसाचा जीव पोपटात असतो तसा माझा जीव या चमच्यात आहे. मी भयंकर अस्वस्थ होते जर तो दिसला नाही की. (असे दोन चमचे होते. एक माझ्या धाकट्या बहिणीकडे होता. तिचा हरवला बहुतेक ३-४ वर्षांपूर्वी. )
मी तो नुसता नेते डब्यात आणि आणते परत.
माझे रोजचे ऑफिस ला न्यायचे डबे ठरलेले असतात. पूर्वी साबा नेमकं माझ्याच डब्यातून कोणाला तरी काहीतरी घालून द्यायच्या. (दिर,जाऊ सगळे जण गोरेगावातच) मग सकाळ च्या गडबडीत मला दुसऱ्या डब्याचा शोध घ्यावा लागायचा. मला सोयीच्या दृष्टीने मी नंतर सांगून टाकलं की माझे नेहमीचे डबे सोडून तुम्ही पाहीजे त्या डब्यातून खाऊ द्या. काही हरकत नाही.
चहाचा कप ठरलेला असा नाही. लेकाचा आणि नवऱ्याचा ठरलेला कप आहे.
बाकी सगळ्यांचे प्रतिसाद आवडले. मला पण लळा वरून संख आठवला.
स्वाती सारखं व्हायला आवडेल. निर्लेप. म्हणजे मी वस्तू अगदी मोडे पर्यंत वापरतेच पण अडकते फार, ऋन्म्या सारखी.

निर्जीव वस्तूंचा लळा लागण्याची सवय हळूहळू कमी होत गेली. शाळेच्या वयात पेन, छान वासाची खोडरबरं, कंपासपेटी, विशिष्ट वही अशा वस्तू जपून ठेवलेल्या होत्या. मोती, म्हैसूर सँडल वगैरे साबणांचे खोके माझ्या पुस्तकांच्या खणात असायचे. त्यामुळे त्यातल्या सगळ्या वह्यापुस्तकांना एक मिश्र सुवास यायचा. हे लिहितानाही तो सुवास जाणवला Happy पुढे हळूहळू त्या सगळ्या वस्तू कुठे गेल्या कुणास ठाऊक.

आता कुठली वस्तू भावनेसाठी जपून ठेवावीशी वाटत नाही. वर अनेकांनी लिहिलंय तसं, ममव मानसिकतेमुळे शक्य तितके जास्त दिवस वस्तू टिकवल्या जातात, एवढंच. व्यक्तींची आठवण म्हणूनही वस्तू ठेवाव्यात असं वाटत नाही. त्या त्या व्यक्तीविषयीची माझ्या मनातली भावना पुरेशी वाटते. आणि यात काही उदासीनता वगैरेही वाटत नाही. मिनिमलिझमही नाही. नवीन कपडे, वस्तूंची आवडही आहेच. असंच आवडतं, एवढंच.

नेहमीच्या घरातल्या वापराच्या गोष्टींबद्दल मला खास लळा नसला तरीही खेळताना वापरलेल्या बॅट, रॅकेट इ. बद्दल व आवडीच्या पुस्तकांबाबत खुपच लळा आहे. आणि हो, लहानपणी कोकणात आम्ही भावंडं ज्या आमच्या होडीतून नदीत हिंडत असू, ती होडी तर अजूनही जिवलग मित्रासारखीच !! एकंदरीत, आत्यंतिक आनदाशी निगडित गोष्टींचा लळा लागत असावा !!

>>>>>
लहानपणी कोकणात आम्ही भावंडं ज्या आमच्या होडीतून नदीत हिंडत असू, ती होडी तर अजूनही जिवलग मित्रासारखीच !!
>>>>>>>>>>

अरे भाऊ हे तर फर्स्टक्लास दाभाडे Happy

अशा ब-याच वस्तू आपल्या दैनंदिन जीवनात असतात. मला लहानपणाच आठवतय. एक टेप रेकाॅर्डर जुना झाला होता आमचा म्हणुन वडील तो विकून नविन घेणार होते. तो घ्यायला मणूसही आला होता. पण मी इतकी रडले तो देणार म्हणुन की वडिलांनी कॅन्सल केला तो देण्याचा आणि घरातच ठेवला.

माझा ही कोणत्या ही गोष्टीत जीव अडकलेला नाही. घरातील कोणती ही गोष्ट ती बदली करू शकते किंवा टाकून देऊ शकते हे मी सुनबाई ना सांगून टाकलं आहे.

कोणतीही वस्तू मी वस्तू पुरेपूर वापरते. अगदी काड्यापेटीची काडी ही शिल्लक असेल तर पुन्हा पेटीत ठेवते , गॅस वर धरून निरांजन लावायला उपयोगी पडते. पण त्यात जीव अडकला आहे म्हणून नाही, तो माझ्या लाईफ स्टाईल चा भाग आहे.

एक टेप रेकाॅर्डर जुना झाला होता
>>>>>
माझा असाच जीव ट्रांझीस्टर मध्ये अडकला होता..
जमाना पुढे गेला.. मोबाईल आले.. त्यात एफ एम रेडिओ आले.. पण मी तो ट्रान्झिस्टर कानाला लाऊन मॅच ऐकायचो. बिघडला, स्टेशन पकडायला त्रास द्यायचा, तरी चक्री फिरवत राहायचो तो त्रास सहन करत, त्यातली मजा वेगळीच होती.

आपण लळा लावला तर त्याला बरा वाईट प्रतिसाद काय आहे हेच न कळण, ही निर्जीवाना लळा लावण्यातली मोठ्ठी गोची असावी ! -

तुझा जीव आहे ह्या होडीवर हे अख्ख्या गांवाला माहीत आहे. पण तिचं प्रेम त्या कांठावरच्या खडकावर बसलं असेल, तर ती तुला थोडंच तें सांगणार आहे !!20200429_143033.jpg

निर्जीवांचा लळा सजीवांपेक्षाही जास्त लागतो असे वाटते>>> मला तरी.
त्या असोशीतही एक गंमत होती आणि या निर्लेपपणातही एक प्रकारचं समाधान आहे.>>>>> सुंदर Happy
हे दुसर्‍याने केलं नाही तर मनावर न घेणे हे मात्र अजुन शिकता आलेलं नाही.>>>>> Happy
मला पण अनेक गोष्टींचा लळा आहे पण attachment नाही. 👍

अन मला हे स्वप्नरंजन आवडते आणि त्या वस्तू सुध्दा कारण त्यांच्या भोवती मोहक क्षण गुंतलेले असतात,>>>> मलापण.

कारे इतका लळा लावुनी नंतर मग ही गाडी सुटते,
डोळ्यांदेखत सरकत जाते आठवणींचा ठिपका होते.
गाडी गेली, फलाटावरी निश्वासांचा कचरा झाला
गाडी गेली, डोळ्यांमधल्या निर्धाराचा पारा फुटला
भारीच 😍

हेहेहेहे ऋतुराज माझ्या चमच्यावरुन हा विषय सापडला का? आता चमच्याचा फोटो टाकलाच पाहिजे. >>>> नक्कीच टाका. मला बघू दे तो ऐतिहासिक चमचा Happy

Fellow humans are my true treasure, तिथे गुंतवणूक आणि गुंता दोन्ही जरा जास्तच आहे >>>> So nice

स्वाती सारखं व्हायला आवडेल. निर्लेप. >>>> हे जमायला हवं.
म्हणजे मी वस्तू अगदी मोडे पर्यंत वापरतेच पण अडकते फार, ऋन्म्या सारखी.>>>> मी पण. आता कमी केलं पाहिजे.

म्हैसूर सँडल वगैरे साबणांचे खोके माझ्या पुस्तकांच्या खणात असायचे. >>>> मी पण साबणाचा कागद पुस्तकात ठेवायचो आधी

ती होडी तर अजूनही जिवलग मित्रासारखीच !! एकंदरीत, आत्यंतिक आनदाशी निगडित गोष्टींचा लळा लागत असावा !!>>>> व्वा, भाऊ

पण मी इतकी रडले तो देणार म्हणुन की वडिलांनी कॅन्सल केला तो देण्याचा आणि घरातच ठेवला.>>> Happy

माझा ही कोणत्या ही गोष्टीत जीव अडकलेला नाही.>>> :आश्चर्य चकित बाहुली:

आपण लळा लावला तर त्याला बरा वाईट प्रतिसाद काय आहे हेच न कळण, ही निर्जीवाना लळा लावण्यातली मोठ्ठी गोची असावी 👍

भाऊ,चित्र मस्त आहे.>>>>>+११११
ऑल माय फॅशन ज्वेलरी. भूत बनणारे मी.>>> Lol

सर्वांना धन्यवाद

माझा ही कोणत्या ही गोष्टीत जीव अडकलेला नाही.>>> :आश्चर्य चकित बाहुली: >>>ऋतुराज , माझं मला ही नवल वाटतं ह्या गोष्टीच... सुनबाई ने विचारलं काकू हे तुम्हाला हवंय की टाकू तर गेल्या पाच वर्षात एकदाही हवय निघालं नाहोये माझ्या तोंडातून

मला कोणतीही गोष्ट टाकून द्यायला जमत नाही. घरातील कोणताही आडवा सरफेस लगेच भरून टाकण्याचे कसब माझ्याकडे आहे. अशा प्रत्येक गोष्टीचा "लळा" असेल असे नाही पण डिक्लटरिंग हे "कधीतरी करू" मधे रोज आज रोख उद्या उधार स्टेट मधे असते Happy पुण्यात आमच्याकडे वडिलांनी घेतलेली पहिली स्कूटर अजूनही ठेवलेली आहे. ती चालणे बंद होउन सुद्धा पंचवीस वर्षे सहज झाली असतील. पण आठवण म्हणून तशीच ठेवली आहे. तेथे आमच्याकडे कार नसल्याने बिल्डिंगचा आमच्या नावावरचा पार्किंग लॉट हा ती जुनी स्कूटर, सध्याच्या बाइक्स, एखाद्या ओळखीच्या माणसाने हक्काने लावलेली गाडी व सोसायटीत बागकामाला येणार्‍या कामकर्‍यांची डबा खायची व लवंडायची जागा इतका बहूउद्देशीय आहे.

पण धाग्याच्या विषयाबद्दल स्पेसिफिकली - जोपर्यंत वस्तू वापरण्यासारखी आहे तोपर्यंत ती टाकायला, बदलायला मला आवडत नाही. गाडीचा प्रचंड लळा असतोच. आम्ही २०११ साली भारतात गेलो तेव्हा दोन्ही कार्स विकायचे माझ्या जीवावर आले होते. पण दोन्ही गाड्या माझ्या मित्रांनीच विकत घेतल्या, त्यामुळे जेव्हा येऊ तेव्हा "भेटतील" या विचाराने चांगले वाटले. इतर बाबतीत अगदी शेल्डन कूपर सारखे "ही माझी जागा", "हा माझा कप" इतके काही नाही पण वस्तू केवळ जुनी झाली म्हणून टाकावी असे कधीच वाटत नाही. उलट अशा वस्तू जास्त आवडतात.

तोच तीन तासांचा प्रवास आहे, पण डेक्कन क्वीनने जाताना जे वाटते ते इंद्रायणी एक्सप्रेसने जाताना नाही. वंदे भारत तर त्याहून नाही. त्यांचीही मजा आहेच, पण त्यात "लळा" नाही.

>>> घरातील कोणताही आडवा सरफेस लगेच भरून टाकण्याचे कसब माझ्याकडे आहे
हे पा, हे त्या सरफेसांचं कसब असतं, त्याचं श्रेय आपण घेऊ नये. तुम्ही होऊन वस्तू ठेवल्या नाहीत तर सरफेसेस कोणाचं लक्ष नसताना आपल्या वस्तू आपण उत्पन्न करतात. Proud

मला निर्जिव वस्तूंचा लळा असा नसतो पण सेटमधला बोल/मग फुटला, चमचा/ फोर्क हरवला की सेट अपूर्ण म्हणून थोडा काळ चुटपुट लागून रहाते. काही गोष्टींचा लळा नाही पण कुणा प्रेमाच्या व्यक्तीने दिलेली ती माझ्याकडची एकमेव वस्तू असते म्हणून जपून ठेवली जाते.

Pages