अग्नीशमन कवायतीची विस्तारित संकल्पना

Submitted by तुष्कीनागपुरी on 28 March, 2025 - 01:58

अग्निशमन कवायतीचा तुमच्या आयुष्यातला अनुभव तुम्हाला वयाच्या कोणत्या वर्षी मिळाला?
.
मी पर्सिस्टंट सिस्टिम्स च्या नागपुरातल्या नव्या इमारतीमधे माझ्या निर्धारित डेस्कवर काम करत असताना २०१२ मधे म्हणजे वयाच्या सुमारे चाळिसाव्या वर्षी मला हा अनुभव पहिल्यांदा मिळाला होता. (संभाव्य घटना नियोजनाची एक संकल्पना, अग्निशमन कवायत जी जगण्याच्या अनेक पातळ्यांवर मला मदत करतेय तिची ओळख आयुष्याच्या इतक्या पुढच्या पातळीवर मिळावी ही खंत आहे.)
.
अचानक अग्नीसूचक भोंगा मोठ्याने वाजायला लागला. कंपनीत प्रत्येक मजल्यावर आणि प्रत्येक विभागात काही लोकांना फायर मार्शल असे अतिरिक्त दायित्व देण्यात आले आहे हे त्यांच्या क्युबिकल वर लावलेल्या फलकावरून निरिक्षणात आलेले होते मला. ते काय आहे यावर मी फार विचार केलेला नव्हता. आमच्या मजल्यावरचे फायर मार्शल लगेच सांगायला आले की आपल्याला सर्व काम थांबवून घाई न करता नियोजित मार्गाने पायऱ्यांचा वापर करून इमारतीतून खाली उतरायचे आहे. ही अग्निशमन कवायत आहे.
.
पूर्ण कंपनी आपले हातातले काम सोडून अश्या पद्धतीने इमारतीखाली गोळा झाली. इमारतीच्या वेगवेगळ्या भागांवर अग्नीघाताच्या वेळी कुठे जायचे कुठे जमायचे याचे फलक लागलेले होते, जे जाता येता डोळ्यांना दिसत पण त्यांचा तितका अर्थ आणि उपयोग विचारात आलेला नव्हता, ते सगळे फलक आता महत्वाचे वाटायला लागले. शाळेची घंटा कुणी मधेच वाजवून द्यावी आणि शाळा सुटली म्हणून विद्यार्थी बाहेर पडावेत तसा आनंद काही लोकांच्या चेहऱ्यावर होता, तर आधीच इतके काम असते त्यात ही नको ती कटकट वेळ खायला मधे आली असे त्रासलेले भाव काहींच्या चेहऱ्यावर होते.
.
थोड्या वेळाने आतून एका स्ट्रेचर वर काही जखमी लोक आणि काही घायाळ लोकांना आधार देऊन बाहेर आणलेले दिसले, अर्थात ते घायाळ असण्याचा अभिनय करणारे नेमलेले लोक होते हे कळत होतेच. नागपुरच्या अग्निशमन दलाची मोठी गाडी बाहेर आलेली होती त्यांच्या अधिकाऱ्याने पाण्याचा फवारा मारून दाखवला आणि त्यांचे काम कसे होईल त्याची माहिती दिली. या प्रयोगातून अग्निघाताच्या अवस्थेत संपूर्ण कंपनी किती सूसूत्र पद्धतीने कमीत कमी वेळात इमारतीला रिकामे करू शकते त्याचे आकडे तयार झाले. आजच्या अभ्यासात आपण इतक्या मिनिटात इमारत रिकामी केली, अशी माहिती जमलेल्या सर्व लोकांना देण्यात आली आणि मग सगळे पुन्हा परत आपापल्या जागांवर परत जावे आणि कामे सुरू करावीत अशी सूचना मिळताच सगळे कामाला लागले.
.
माझा हा अग्निशमन कवायतीचा पहिला अनुभव होता. मनात येत होते की खरेच जर कधी कुठे आग लागली आणि असा अग्निघाताचा भोंगा वाजला तर काय करायचे त्याचे एक प्रात्यक्षिक आपल्याला मिळाले आहे. आता तसे कधी झालेच तर आपण काय करायचे याचा गोंधळ न होता किमान एकदा आपण ही कवायत केलेली आहे त्याची स्मृती आपल्याला तेच परत करायला मदत करेल.
.
जेव्हा मी या अग्निशमन कवायतीचा विचार करतो तेव्हा मनात येते की ही कवायत इतक्या लोकांचे काम थांबवते, जवळजवळ एक तास या कवायतीत जातो असे दिसते. म्हणजे एक कामाचा तास या कवायतीच्या माध्यमातून कामाच्या विना जातो. तसे पाहिले तर कंपनी सर्वांना या गेलेल्या एका तासाचा देखील पगार देणारच आहे पण हा तास काम झाले नाही तर तो तास कंपनीला खर्च म्हणून मांडावा लागेल, म्हणजेच इतक्या लोकांचा तो एक तास नफा निर्माण करण्याचे काम न करता, नियोजन आणि व्यवस्थापन खर्च समजून स्वीकार करावा लागेल.
.
कंपन्यांना कदाचित कायद्याने अश्या कवायती घडवून आणणे बंधनकारक आहे त्यामुळे त्यांना कायद्यासाठी अर्हता सिद्ध करायला तसे करणे आवश्यक आहे. असा कायदा असतो आणि कंपनीला असे करावेच लागते ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली. असा कायदा असावा आणि त्याचा काय फायदा झाला याबद्दल विचार आले आणि ते आवश्यक आहेत हे पटले.
.
एखादी संभाव्य घटना घडेलच याची शाश्वती नाही तरीही ती घडली तर आपण त्या घटनेचे निवारण आणि नियोजन करू शकतो का याचा अंदाज प्रत्यक्ष तशी घटना अनुभवलीच नसेल तर आपल्याला लावता येणार नाही किंबहुना त्यात किती वेळ उर्जा आणि खर्च होईल याचे कोणतेच आकडे आपल्याला माहिती नसणार हे समजून ती घटना घडली आहे आणि त्यावर आपले निवारण नियोजनाचे काय काय उपाय आहेत ते सगळे एकदा करून पाहणे यालाच संभाव्य घटना नियोजन कवायत म्हणता येईल.
.
अश्या कवायती केल्या तर त्यात वेळ जाईल त्यात त्रास होईल हे खरे पण त्यात शिक्षण मिळेल अभ्यास होईल, आणि कोणत्या परिस्थितीत आपण काय करतो त्याची पूर्वकल्पना आपल्याला मिळेल आणि त्यांचे सांख्यिकी आकडे तयार होतील ते पुढच्या नियोजनात वापरता येतील असा या संकल्पनेचा विस्तार करता येतो हे लक्षात आले.
.
ही कवायत करण्याच्या आधी माझ्यात काय नव्हते आणि आता ही कवायत करून झाल्यावर माझ्यात काय नवीन आहे याचा विचार केला तर कदाचित माझ्या मनात आता अग्निघाताच्या वेळेस काय करायचे त्याचे मज्जापातळीवर काही बदल झालेले असणार. आता मला असे काही झाले की विचार देखील न करता, कुणाला प्रश्न देखील न विचारता काय करायचे ते सुचेल आणि मी एक निर्धारित कृती सुरू करायला अजिबात विलंब न करता ती करू शकेन, हे माझे प्रशिक्षण माझ्या मज्जासंस्थेमधे कुठेतरी जतन झाले हा माझ्यातला बदल मला महत्वाचा वाटतो. स्वसंरंक्षणाची आपल्या शरीरात एक स्थापित प्रणाली असते तिला स्वसंरक्षण प्रणाली म्हणूया तिच्यात ही एक ज्ञानाची भर पडली आणि आपली स्वसंरक्षण प्रणाली अधिक विकसित झाली हे यातून मिळालेले हशील आहे.
.
ही कवायत मी केलेलीच नसेल तर काय फरक पडेल? जर अग्निघाताची वेळ आली आणि मी त्यात अडकलो, तर मी धावेन, लोक जाताहेत त्या दिशेन विचार न करता जमेल तसे धावेनच. अग्निशमन सूचनेचा भोंगा वाजला तरी मी त्यावर लक्ष देणार नाही कदाचित मला ते कळायला वेळ लागेल की काही तरी झालेले आहे आणि आपल्याला ही जागा सोडायची आहे. नंतर जागा सोडताना मी कदाचित घाबरून असे काहीतरी करेन ज्याने अफरातफर होऊ शकते आणि माझ्या घाबरण्यामुळे विचारांची सूसूत्रता मला सांभाळता येणार नाही तेव्हा जे समोर दिसेल त्यातूनच काहीतरी करायचा मी प्रयत्न करेन. हे अंधारात हात पाय चालवण्यासारखे होईल.
.
हा विचार आल्यावर या कवायतिचे महत्व माझ्या मनात अधिक प्रबळ झाले. एक कवायत केल्याने आपल्यामधे असे काही निर्माण होते ज्याने आपण तश्या संभाव्य घटनेमधे काय करणार याचे प्रशिक्षण शरीराला मनाला मिळते, एक प्रकारे आपली स्वसंरक्षण प्रणाली अधिक विकसित होते हे समजले. ही कवायत केली नसती तरी काही लगेच काही बिघडले नसते. पण ही कवायत करणे भविष्यातला संभाव्य घटनेचा धोका निवारण करता यावा यासाठी एक महत्वाची कृती होती.
.
आपल्या आयुष्यात तात्काळ करण्याची कामे आणि महत्वाची कामे अश्या दोन प्रकारची कामे असतात त्यात आपण तात्काळ करण्याच्या कामांना प्राधान्य देतो कारण ते तात्काळ करायचेच असतात. महत्वाची कामे तात्काळ नसली तर ती मागे राहू शकतात आणि मग जेव्हा ती कामे तात्काळ श्रेणीत येतात तेव्हा कदाचित आपल्याला ती कामे करण्यासाठी लागणारी साधने आणि प्रशिक्षण याचा अभाव होऊ शकतो म्हणून या महत्वाच्या कामांचे देखील नियोजन करून ती घडवून आणणे आवश्यक असते.
.
संभाव्य घटना नियोजन कवायत, असेच एक महत्वाचे काम आहे असे मला वाटते. ते केल्याने आपल्या साधनांमधे, ज्ञानामधे आणि स्वसंरंक्षण प्रणालीमधे आवश्यक बदल आणि विकास होतात त्यांची आपल्याला ती संभाव्य घटना घडलीच तर मदत होते. त्यामुळे या कवायती म्हणजे आपला भविष्यात येणाऱ्या आपदेचा विमा असतो हे समजणे खूप महत्वाचे आहे.
.
अनेक गोष्टीबद्दल आपल्या मनात एक नकळत विश्वास असतो की असे झाले तर आपण ती वेळ निभावून नेऊ. तशी आपल्याला स्वतःबद्दल खात्री असते. पण संभाव्य घटना नियोजन संकल्पनेचा अभ्यास झाल्यामुळे मला एक पटते की काही गोष्टी ज्यांची प्राथमिकता फार जास्त आहे त्यांना आपण ते वेळ येईल तेव्हा सांभाळून घेऊ या मानसिक दिलास्याच्या पुढे जाऊन प्रत्यक्षात तसे झाले तर काय करायचे याचा सराव आणि अभ्यास करून एकदा तपासता आले तर आपल्याला सांख्यिकी आकड्यांसकट माहिती उपलब्ध होईल आणि आपण जो विश्वास मनात जपला होता तो कदाचित दृढ होईल, आणि काही गोष्टी त्यातून अश्या देखील पुढे येतील ज्याचा आपल्याला कधी विचार करायची गरजच पडली नव्हती त्या उजागर होतील आणि त्यांचा विचार करणे होईल.
.
एक उदाहरण घेऊया. मी हे लिहितोय ते एका लॅपटॉप वर लिहितोय. या लॅपटॉप वर माझा बराच डेटा सध्या आहे. त्यातल्या महत्वाच्या डेटा साठी मी एक बॅकप डिस्क ठेवली आहे. दर आठवड्याला मी त्या डिस्क मधे काही महत्वाचा डेटा कॉपी करून ठेवत असतो. याला माझी बॅकप प्रणाली म्हटले तर ती कृती मी दर आठवड्याला करतो. आत संभाव्य घटना नियोजन या दृष्टीकोनातून पाहिले तर हे मी का करतो तर कधी माझा लॅपटॉप क्रॅश झाला, पडला सुरूच होत नसला किंवा हारवला तरीही माझ्या डेटाचे खूप नुकसान होऊ नये म्हणून मी ठेवलेला हा विमा असतो. लॅपटॉप तर गेला पण किमान मला जो डेटा लागतो तो मला अजूनही नव्या लॅपटॉप मधे परत आणता येईल अशी ती योजना असते.
.
पण जेव्हा ती घटना प्रत्यक्ष घडेल तेव्हा मी काय करेन याचा अभ्यास मी केलेला नाहीये. हे माझ्या लक्षात आले. संभाव्य घटना नियोजन कवायत म्हणजे, आपण जे होऊ नये ते झाल्यावर काय करणार याचा तपास. त्यासाठी आपल्याला अभ्यास म्हणून तसे झालेले आहे असे समजावे लागेल आणि मग त्या घटनेत आपण काय काय करणार हे ठरवलेले आहे ते सगळे करून पहावे लागेल. माझ्या बाबतित मला असे समजावे लागेल की आता माझा लॅपटॉप हारवला आहे आणि त्या डिस्क वरच्या डेटा ला घेऊन एका वेगळ्या लॅपटॉप मधे कॉपी करून माझी कामे करून पहावी लागतील की ती करता येताहेत की नाही.
.
हे करून पाहिले तेव्हा मला कळले की कुठे कुठे मी माहिती ठेवायला विसरलो. या कवायतीतून असे समोर आले की
.

  • काही डेटा मला हवा तो कॉपी केलेला नाही
  • काही डेटा वापरायला लागणारी साधने नव्या लॅपटॉप मधे नाहीत त्यांची यादी पण ठेवावी लागेल म्हणजे नवा लॅपटॉप जुन्या डेटा घेऊन तयार करतांना या गोष्टी माहिती असल्याने त्या यादीप्रमाणे करता येतील आणि वेळ वाचेल
  • माझी डेटा ची डिस्क सुद्धा करप्ट म्हणजेच खराब होऊ शकते म्हणून त्या डिस्क ची सुद्धा एक प्रत असावी जी वेगळया जागेवर ठेवावी म्हणजे ही डिस्क काही कारणाने खराब झाली, हारवली तर ती दुसरी डिस्क बॅकप ऑफ बॅकप म्हणून वापरता येईल

.
अगदी मानसिक कवायत करूनही अनेक गोष्टी समोर आणता येतात अशी या कवायतीचा फायदा आहे हे लक्षात आले.
.
तुम्ही विचार केला तर तुमचे सुद्धा अनेक बाबतीत अश्या कवायतींची तुम्हाला कशी मदत झाली याचे अनुभव तुम्ही तपासून पाहू शकता.
.
अजून काही बाबतीत मला अश्या कवायती कराव्या असे वाटते त्याची यादी मांडतो आहे, बघा तुम्हाला यातले काय घ्यावेसे वाटते आणि कदाचित तुम्हाला अजून काही महत्वाचे सूचेल जे मी मांडलेले नाही
.

  • घरात दिवे गेले आणि दोन दिवस आलेच नाहीत तर
  • चोविस तास कोणतेच डिजीटल उपरकरण वापरता आले नाही तर
  • घरात कुणी रात्री घुसले तर
  • घरात कुणाला वैद्यकीय आघात झाला तर
  • आई बाबा अपघाताने जेरबंद झाले असले तर मुलांनी काय करायचे

.
अश्या कितीतरी कवायती माझ्या मनात आल्या आणि त्यावर किमान विचार सुरू झाले, ते देखील एक प्रकारचे प्रशिक्षणच म्हणावे लागेल.
.
(प्रबंधक)
तुषार जोशी
नागपूर, शुक्रवार, २८ मार्च २०२५

Group content visibility: 
Use group defaults